भारताला सदस्यत्व नसणे योग्य नाही; एस. जयशंकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

United Nations Security Committee not right for India not to be member S Jaishankar

भारताला सदस्यत्व नसणे योग्य नाही; एस. जयशंकर

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये भारत नसणे हे या जागतिक संस्थेसाठी योग्य नाही आणि या समितीच्या रचनेत सुधारणा आवश्‍यक असून त्यासाठी प्रचंड विलंब झाला आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज ठामपणे सांगितले. या समितीमध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही जयशंकर यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसाठी जयशंकर हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. आज कोलंबिया विद्यापीठातील एका कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी बोलताना जयशंकर म्हणाले की,‘‘संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत सुधारणा करण्याच्या मागणीत भारत आघाडीवर आहे. बदलत्या राजकीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे ही सुधारणा अत्यावश्‍यक असून ती अनेक वर्षे आधीच होणे अपेक्षित होते.

सुरक्षा समितीचा कायमस्वरुपी सदस्य होण्यास भारत अत्यंत पात्र देश आहे.’’ सुरक्षा समितीमध्ये सध्या पाच कायमस्वरुपी आणि १० अस्थायी सदस्य देश आहेत. अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स हे पाच कायमस्वरुपी सदस्य असलेले देश कोणत्याही मुद्द्यावर व्हेटो अधिकार वापरू शकतात. बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार इतरही देशांना या समितीत स्थान मिळणे आवश्‍यक आहे, अशी भारताची भूमिका आहे.

भारत हा महत्त्वाचा देश : ब्रिटन

जागतिक राजकारणात भारत हा अत्यंत महत्त्वाचा देश असून भौगोलिक आकार, अर्थव्यवस्था आणि इतर देशांवर असलेला प्रभाव पाहता या देशाने अधिक मोठी भूमिका निभावल्यास ब्रिटनचा त्यांना पाठिंबा असेल, असे ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेम्स क्वेव्हरी यांनी आज आमसभेत बोलताना सांगितले. सुरक्षा समितीच्या कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी त्यांनी भारताला पाठिंबाही व्यक्त केला.

अमेरिकेचा भारताला पाठिंबा

वॉशिंग्टन : सुरक्षा समितीमधील कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी अमेरिकेचा भारतासह जर्मनी आणि जपानला पाठिंबा आहे, असे ‘व्हाइट हाऊस’तर्फे आज जाहीर करण्यात आले. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही आमसभेतील त्यांच्या भाषणात संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा घडवून आणण्यास पाठिंबा व्यक्त केला आहे. बदलत्या जगाला आणि नव्या समस्यांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यासाठी सर्वांना सहभागी करून घेणे अधिक फायदेशीर आहे, असे बायडेन यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.

Web Title: United Nations Security Committee Not Right For India Not To Be Member S Jaishankar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..