
काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या मिसिसिपी शहरात विनाशकारी चक्रीवादळ आणि जोरदार वादळानं कहर केला होता, त्यामुळं अनेक घरांची पडझड झाली होती.
America Tornado : अमेरिकेत भीषण चक्रीवादळाचा कहर; 21 जणांचा मृत्यू, डझनभर लोक जखमी
या विनाशकारी वादळानं अमेरिकेच्या दक्षिणेकडील भागात (America Tornado) पुन्हा कहर केलाय. देशातील विविध भागात भीषण वादळ आणि चक्रीवादळामुळं 21 जणांचा मृत्यू झाला आहे.
त्याचबरोबर डझनभर लोक जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रशासनाकडून बाधित भागात मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. तसंच, पीडितांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
CNN च्या वृत्तानुसार, शुक्रवारी पहाटे युनायटेड स्टेट्सच्या (United States) दक्षिण आणि मध्य-पश्चिम भागांमध्ये विनाशकारी वादळानं कहर केला. इलिनॉयमध्ये या उद्रेकात आणखी चार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं वादळातील मृतांची संख्या 21 झाली आहे. अहवालानुसार, वेगवेगळ्या ठिकाणी 60 हून अधिक चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, शुक्रवारी दुपारी आर्कान्सामधील लिटल रॉक आणि इतर ठिकाणी विनाशकारी चक्रीवादळ धडकलं. यामध्ये अनेक घरं उद्ध्वस्त झाली आणि त्यामुळं अनेकांचा मृत्यू झाला, तसंच अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आपत्कालीन व्यवस्थापनाच्या आर्कान्सा विभागाच्या प्रवक्त्या लट्रेशा वुड्रफ यांनी सांगितलं की, 'क्रॉस काउंटीमधील लिटल रॉकच्या ईशान्येला चार लोक ठार झाले आहेत. विएनमध्ये अनेक इमारतींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय'. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या मिसिसिपी शहरात विनाशकारी चक्रीवादळ आणि जोरदार वादळानं कहर केला होता, त्यामुळं अनेक घरांची पडझड झाली होती. यात 23 जणांचा मृत्यू झाला होता.