अमेरिका भारताच्या मदतीला; व्हेंटिलेटर्सचा करणार पुरवठा

वृत्तसंस्था
Saturday, 16 May 2020

भारताकडूनही करण्यात आली होती मदत

वॉशिंग्टन : जगभरात कोरोना व्हायरसचे संकट कायम आहे. अमेरिकेसह भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग आटोक्यात आणता यावा, यासाठी सर्वच देशांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यानंतर आता भारताच्या मदतीला अमेरिका आली आहे. भारतातील वाढती रुग्णसंख्या पाहता अमेरिकेकडून व्हेंटिलेटर्सचा पुरवठा केला जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतचे ट्विट शनिवारी केले. त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवला असून, कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार असल्याचेही त्यांनी यामध्ये म्हटले आहे. ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले, की 'अमेरिका आमच्या मित्र देश भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार आहे, हे सांगायला मला अभिमान वाटतो. याशिवाय कोरोनासारख्या या महामारीच्या काळात आम्ही भारत आणि नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे आहोत'.

तसेच आम्ही कोरोनाविरोधात लस विकसित करण्यासाठी सहकार्य करत आहोत. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन या अदृश्य शत्रूचा पराभव करु, असेही त्यांनी सांगितले. 

भारताकडूनही करण्यात आली होती मदत

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधांची मागणी केली होती. त्यानंतर भारताने या मागणीची तातडीने दखल घेत अमेरिकेला हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधांचा पुरवठा केला होता.

Ventilators

त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत भारताला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता भारताला गरजेची असलेल्या व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्याबाबत सहमती दर्शवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अमेरिकेकडून भारतात व्हेंटिलेटर्स आणले जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: United States will donate ventilators to India says donald trump