चीन भारताच्या सीमेवर घुसखोरी करत असल्याचा अमेरिकेचा आरोप; भारताची केली पाठराखण

पीटीआय
शनिवार, 23 मे 2020

चीनने आरोप फेटाळला
बीजिंग - चीन भारताच्या सीमेवर घुसखोरी करत असल्याचा अमेरिकेचा आरोप चीनने आज फेटाळून लावला. सीमेबाबत भारत आणि चीनमध्ये राजनैतिक मार्गाने चर्चा सुरु असून अमेरिकेने यात लक्ष घालण्याचे कारण नाही, असा टोलाही चीनने मारला आहे. ‘सीमेवरील चिनी सैन्य आमच्या प्रदेशाच्या स्वायत्ततेचे रक्षण करत आहेत. भारतीय सैन्याने मर्यादा ओलांडल्यास त्याचा विरोधही आम्ही करतो. भारतानेही आमच्याबरोबरच थेट चर्चा करून मार्ग काढावा. अमेरिकेने यात लक्ष घालण्याचे कारण नसून त्यांची टिपण्णी ‘नॉनसेन्स’ आहे,’ असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

वॉशिंग्टन - भारतासह इतर शेजारी देशांविरोधात चीन चिथावणीखोर लष्करी कारवाया करत आहे, असा दावा अमेरिकेने केला आहे. चीनच्या घुसखोरीला जोरदार विरोध करण्याच्या भारताच्या भूमिकेचे अमेरिकेच्या वरीष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याने कालच समर्थन केले होते. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही अमेरिकेने भारताची पाठराखण केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जगभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

‘व्हाइट हाऊस’ने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात भारत-चीन वादाबाबत टिपण्णी करण्यात आली आहे. ‘शेजाऱ्यांबरोबर झालेल्या करारांचे पालन न करता चीन पिवळा समुद्र, दक्षिण चीन समुद्र, तैवान आणि भारत-चीन सीमेवर आक्रमक लष्करी धोरण राबवित चिथावणीखोर कारवाया करत आहे. चीनचे सामर्थ्य वाढत असून त्याबरोबरच चिनी कम्युनिस्ट पक्षाची विस्तारवादी अपेक्षाही वाढत असून या उद्दीष्टाला अडथळा येऊ शकणाऱ्यांविरोधात काम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. चिनी सरकारची आश्‍वासने आणि त्यांची कृती यात प्रचंड विरोधाभास आहे,’ असे या अहवालात म्हटले असून तो संसदेपुढे सादर करण्यात आला आहे.

मेक्सिकोत नव्या संस्कृतीचा शोध? तब्बल 15 हजार वर्षांपूर्वीचे अवशेष लागले हाती...

उत्तर सिक्कीम भागात सीमेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये नुकतीच चकमक झाली होती. त्यानंतर सीमेवर तणाव वाढला आहे. चीनला विरोध करण्याच्या भारताच्या भूमिकेचे समर्थन करत अमेरिेकेने चीनला समज दिली आहे. चीनने आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करावे. आंतरराष्ट्रीय व्यापारावर गैरमार्गाने वर्चस्व मिळविण्याचा चीनचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. चीनने आक्रमकपणा करू नये, असे अमेरिकेने म्हटले आहे.

पाकिस्तान विमान अपघात : पायलटने मदतीसाठी साधला होता संपर्क

सहज सोडून देणार नाही - ट्रम्प
जगभरात थैमान घालणारा कोरोना विषाणू चीनमधूनच सर्वत्र पसरला असून अमेरिका ही बाब सहज सोडून देणार नाही, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दिला. मिशीगन येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलताना ट्रम्प म्हणाले की, कोरोना चीनमधूनच आला आहे. आम्ही त्यांच्याबरोबर एक व्यापार करार केला होता. त्याची शाई वाळली नसतानाच हे सगळे उद्भवले. आम्ही हा प्रकार सहज सोडून देणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US accuses China of infiltrating Indias border