भारत आमचा खरा मित्र : ट्रम्प

पीटीआय
बुधवार, 25 जानेवारी 2017

ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत सर्वांना आश्चर्याचा धक्का देत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर त्यांचे अभिनंदन करणाऱ्या पहिल्या पाच नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी यांचा समावेश होता. अध्यक्षपदी निवडून आल्यास इस्राईल आणि भारतासोबतचे संबंध दृढ करू, असे सूतोवाच ट्रम्प यांनी निवडणूकपूर्व प्रचारादरम्यान केले होते. 

दहशतवादाविरोधात खांद्याला खांदा लावून लढू

वॉशिंग्टन- भारत हा अमेरिकेचा खरा मित्र देश आहे असे वर्णन करीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या वर्षअखेरीस अमेरिकेला भेट देण्यासाठी निमंत्रण दिले आहे. तसेच, दहशतवादाविरोधातील जागतिक पातळीवरील लढ्यामध्ये भारत आणि अमेरिका खांद्याला खांदा लावून उभे राहतील, असा निश्चय यावेळी दोन्ही नेत्यांनी केला. 

दोन्ही देशांचे नेते फोनवर बोलल्यानंतर व्हाईट हाऊसने याबाबतची माहिती दिली. यावेळी व्यापार, संरक्षण आणि दहशतवाद या विषयांवर चर्चा झाली. ट्रम्प यांनी अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. 

"अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी सलोख्याची चर्चा झाली. येणाऱ्या काळात द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करू" असे मोदी यांनी सांगितले. तसेच, मोदी यांनीही ट्रम्प यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले आहे. 

या चर्चेचा तपशील देताना व्हाईट हाऊसने सांगितले की, "भारत हा एक खरा मित्र आणि जगापुढे असलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठीचा सहकारी आहे असे अमेरिका मानते, असे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलताना सांगितले."
तसेच, 2017च्या अखेरीस मोदी यांच्या अमेरिका भेटीच्या आयोजनाबाबत अध्यक्ष ट्रम्प उत्सुक आहेत, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. 

प्रामुख्याने अर्थव्यवस्था आणि संरक्षण या क्षेत्रांमधील भारत आणि अमेरिकेची भागीदारी वाढविण्याबाबत त्यांनी चर्चा केली. याशिवाय, दक्षिण आणि मध्य आशियातील सुरक्षेसंदर्भातही त्यांच्यात बोलणी झाली. दहशतवादाविरोधातील जागतिक लढ्यामध्ये भारत आणि अमेरिका खांद्याला खांदा लावून उभे राहतील, असा संकल्प अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांनी केल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. 

ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत सर्वांना आश्चर्याचा धक्का देत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर त्यांचे अभिनंदन करणाऱ्या पहिल्या पाच नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी यांचा समावेश होता. अध्यक्षपदी निवडून आल्यास इस्राईल आणि भारतासोबतचे संबंध दृढ करू, असे सूतोवाच ट्रम्प यांनी निवडणूकपूर्व प्रचारादरम्यान केले होते. 
 

Web Title: US and India will stand together against terrorism, resolve Trump and Modi