अमेरिका चीनला देणार दणका; कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांवर व्हिसा बंदीची शक्यता 

कार्तिक पुजारी
Friday, 17 July 2020

अमेरिकेने चीनविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसत आहे. चीनवर दबाव वाढवण्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेने चीनविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसत आहे. चीनवर दबाव वाढवण्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांवर व्हिसा बंदीची कारवाई करण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉल स्ट्रिट जनरलने दिलेल्या माहितीनुसार कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांवर व्हिसा बंदी आणण्याचा विचार ट्रम्प करत आहेत.

मनुताई’च्या विद्यार्थिनी करणार भारताचे प्रतिनिधित्व
परराष्ट्रमंत्री माईक पोम्पियो यांनी याबाबतचे सुतोवाच केले आहेत. चिनी कम्युनिस्ट पक्षाला मागे खेचण्याची हीच वेळ आहे. आपल्याला अमेरिकेच्या पंरपरेने वागायचे आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी अनेक युक्त्या सध्या राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टिमच्या डोक्यात आहेत, असं पोम्पियो म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी कॉम्युनिस्ट पक्षाचे नाव घेणे टाळले.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनिंग यांना यासंबंधी प्रतिकिया विचारण्यात आली होती. अमेरिकेचा व्हिसा बंदी आणण्याचा निर्णय जगातील एका शक्तीशाली देशाविरुद्धचा दयनीय प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. आम्हाला आशा आहे की आंतरराष्ट्रीय संबंध आणि आपली विश्वसनीयता राखण्यासाठी अमेरिका कोणतेही पुढचे पाऊल उचलणार नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प वारंवार चीनवर टीका करत आहेत. अमेरिकेतील कोरोना विषाणूच्या उद्रेकाला त्यांनी चीनला जबाबदार धरलं आहे. चीनने वेळीच माहिती दिली असती तर कोरोनाचा इतका प्रसार झाला नसता, असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. 

मंत्र्यांच्या मुलाला रोखणाऱ्या कॉन्स्टेबल सुनितावर 3 आरोप, मागे लागलाय चौकशीचा...
मागील आठवड्यात अमेरिकेने चीनच्या तीन अधिकाऱ्यांना व्हिसा बॅन करणार असल्याचं म्हटलं होतं. आता सरसकट कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांना बंदी आणल्यास हा मोठा निर्णय असू शकतो. दरम्यान, चायनीज राज्य माध्यमानुसार 2019 मध्ये जवळजवळ 9 कोटी लोक पक्षाशी संबंधित होते. यात 35 टक्के कामगार आणि शेतकऱ्यांचाही समावेश आहे. अनेक चिनी लोकांसाठी 99 वर्ष जुन्या असणाऱ्या पक्षाची संबंधित असणे मोठी गोष्टी असते. विशेष म्हणजे ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाचे संस्थापक जॅक मा हेही या पक्षाचे सदस्य आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US Considering Visa Ban On All Chinese Communist Party Members