सौदी अरेबियास शस्त्रास्त्रविक्रीवर मर्यादा आणू: अमेरिका

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

येमेनमधील हौथी बंडखोर आणि सरकार यांच्यामध्ये रक्तरंजित संघर्ष सुरु असून सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडी हौथींविरोधात जोरदार हल्ले चढवित आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या लष्करी सहकार्यास "मर्यादा' असल्याचा इशारा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी दिला आहे

वॉशिग्टन - येमेनमध्ये केल्या जाणाऱ्या हवाई हल्ल्यांत निष्पाप नागरिकांच्या जात असलेल्या वाढत्या बळींच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने सौदी अरेबियास विकल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांवर मर्यादा आणण्याचे आश्‍वासन दिले आहे. सौदी अरेबियास यापुढे नेमका लक्ष्यभेद (प्रिसिजन गाईडेड) करु शकणारी शस्त्रास्त्रे विकली जाणार नाहीत, असे पेंटॅगॉनमधील एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. येमेनमध्ये "चुकीच्या पद्धतीने' घडविण्यात येणाऱ्या हवाई हल्ल्यांबद्दल ओबामा प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.

गेल्या ऑक्‍टोबर महिन्यात येमेनमधील एका प्रेतयात्रेवर चढविण्यात आलेल्या हल्ल्यांत 140 नागरिक मृत्युमुखी पडले होते. येथील हौथी बंडखोर आणि सरकार यांच्यामध्ये रक्तरंजित संघर्ष सुरु असून सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडी हौथींविरोधात जोरदार हल्ले चढवित आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या लष्करी सहकार्यास "मर्यादा' असल्याचा इशारा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी दिला आहे.

अर्थात, शस्त्रास्त्रविक्रीवर मर्यादा आणण्यात आली असली; तरी अमेरिकेकडून सौदी अरेबियास सीमा सुरक्षेसंदर्भातील संवेदनशील माहिती दिली जाणार आहे. याचबरोबर, सौदी अरेबियाच्या या मोहिमेमध्ये सहभागी असलेल्या वैमानिकांना अमेरिकेकडून प्रशिक्षणही दिले जाणार आहे. याचबरोबर, अमेरिकेकडून सौदी अरेबियास लष्करी हेलिकॉप्टर्सही विकली जाणार असून या कराराची एकूण किंमत 3 अब्ज डॉलर्स इतकी आहे.

2014 मध्ये येमेनेमधील संघर्ष सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत हजारो नागरिक मृत्युमुखी पडले असून हौथींनी येमेनची राजधानी सनावर नियंत्रण मिळविले आहे.

Web Title: US to cut arms sales to Saudi Arabia