अमेरिकेने पाकच्या संसद उपाध्यक्षांना नाकारला व्हिसा

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

पाकिस्तानी संसदेचे अध्यक्ष रझा रब्बानी यांनी या प्रकरणाची दखल घेऊन दोन्ही खासदार प्रतिनिधींचा अमेरिका दौरा रद्द करण्याचे निर्देश दिले. 

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या संसदेचे उपाध्यक्ष आणि पाकमधील एका मोठ्या इस्लामिक पक्षाचे नेते मौलाना अब्दुल गफूर हैदरी यांना आज (रविवारी) अमेरिकेने व्हिसा नाकारला. यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयामध्ये होणाऱ्या संसद परिषदेच्या बैठकीला जाणे पाकिस्तानच्या शिष्टमंडळाला रद्द करावे लागले आहे. 

मौलाना हैदरी हे जमियत उलेमा इस्लाम या संघटनेचे सरचिटणीस व संसदेचे उपाध्यक्ष आहेत. ते आणि त्यांचे सहकारी असे दोन सदस्यीय शिष्टमंडळ 13 आणि 14 फेब्रुवारीला संसद बैठकीसाठी न्यूयॉर्कला जाणार होते. मात्र, आज अमेरिकेने तांत्रिक अडचण सांगत हैदरी यांना व्हिसा नाकारला. 

विशेष म्हणजे हैदरी यांच्यासोबत पाकिस्तानी संसदेतील खासदार लेफ्टनंट जनरल सलाउद्दीन तिरमिझी हे जाणार होते. त्यांचा व्हिसा मात्र दोन दिवसांपूर्वीच मंजूर करण्यात आला आहे.  येथील संसदेचे अध्यक्ष रझा रब्बानी यांनी या प्रकरणाची दखल घेऊन दोन्ही खासदार प्रतिनिधींचा अमेरिका दौरा रद्द करण्याचे निर्देश दिले. 
 

Web Title: US Denies Visa to Pakistan's Senate Deputy Chairman Maulana Abdul Ghafoor