व्वा! राष्ट्राध्यक्ष खोटं बोलत असल्याने टीव्ही चॅनेल्सनी लाईव्ह प्रसारण थांबवलं

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 6 November 2020

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला होत असलेला पराभव स्वीकारण्यास नकार दिला आहे

वॉशिंग्टन- डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ज्यो बायडेन विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला होत असलेला पराभव स्वीकारण्यास नकार दिला आहे. ट्रम्प यांना आपला पराभव दिसू लागल्याने ते अनेक खोटे आरोप करु लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प खोटे आरोप आणि चुकीची माहिती देत असताना अनेक टीव्ही वाहिन्यांनी त्यांचे लाईव्ह कव्हरेज थांबवल्याचा प्रकार घडला आहे. 

डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीनंतर गुरुवारी पहिल्यांदाच लोकांशी संवाद साधत होते. यावेळी अनेक टीव्ही वाहिन्यांनी त्यांचे लाईव्ह कव्हरेज थांबवण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प चुकीची माहिती पसरवत असल्याचे कारण या वाहिन्यांनी दिले आहे. ट्रम्प यांनी आपल्या भाषणादरम्यान डेमोक्रॅटिक पक्षावर गंभीर आरोप केले. डेमोक्रॅटने आमच्यापासून निवडणूक चोरली आहे आणि त्यांनी बेकायदेशीर मतं मिळवल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.  

जॉर्जिया-मिशीगनची कायदेशीर लढाईही ट्रम्प हारले; कल बायडेन यांच्याच बाजूने

MSNBC अँकर ब्रायन विलियम्स यांनी लाईव्ह कव्हरेज बंद करताना म्हटलं की, आम्ही अमेरिकेच्या अध्यक्षांचे भाषण थांबवत आहोत, तसेच त्यांची चुक सुधारत आहोत. NBC आणि ABC वाहिन्यांनीही ट्रम्प यांचे लाईव्ह कव्हरेज थांबवले होते. अमेरिकीसाठी आज वाईट दिवस आहे की, आपला राष्ट्राध्यक्ष निवडणूक चोरल्याचा आरोप करत आहेत. खोटं, खोटं आणि खोट्यानंतर खोटं आणि तेही कोणत्याही पुरुव्याशिवाय, असं सीएनएनचे जॅक टेपर म्हणाले आहेत. 

दरम्यान, डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन (Joe Biden) हे 264 इलेक्टोरल मते मिळवून आघाडीवर आहेत. त्यांना बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी फक्त 6 मतांची आवश्यकता आहे. तर सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर असून त्यांना फक्त 214 मते मिळाली आहेत. तरीही ट्रम्प यांच्याकडून विजयाचा दावा केला जात आहे. मतमोजणीमध्ये गैरव्यवहाराचा आरोप करत ट्रम्प न्यायालयात पोहोचले आहेत. त्याआधी निवडणूक निरीक्षकांनी ट्रम्प यांचे आरोप वस्तुस्थितीला धरून नसल्याचे म्हणत फेटाळून लावले आहेत. आता न्यायालय काय निकाल देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election 2020 TV Networks Break From Live donald Trump Address