US election:डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्रपतीपदाचा मार्ग खडतर; जो बायडेन यांनी टाकले मागे

कार्तिक पुजारी
Friday, 17 July 2020

एक ताज्या सर्वेक्षणानुसार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आपले प्रतिस्पर्धी आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यापेक्षा पिछाडीवर असल्याचं दिसत आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एक ताज्या सर्वेक्षणानुसार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आपले प्रतिस्पर्धी आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यापेक्षा पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. जर हेच अंतर कायम राहिले तर डोनाल्ड ट्रम्प निवडणूक हरण्याची शक्यता आहे.

मोदी सरकारच्या चुकांमुळे चीनला बळ मिळालं; राहुल गांधींनी डागली तोफ
अमेरिकेच्या क्लिनियॉक विद्यापीठाच्या सर्वेक्षणानुसार राष्ट्रपती ट्रम्प जो बायडेन यांच्यापेक्षा 15 अंकांनी मागे आहेत. या सर्वेक्षणात भाग घेतलेल्यांपैकी 52 टक्के लोकांनी बायडेन यांच्या बाजूने मत दिलं आहे. तर फक्त 33 टक्के लोकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने समर्थन दर्शवलं आहे. त्यामुळे अशीच स्थिती कायम राहिली तर ट्रम्प यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

अमेरिकी राष्ट्रपती निवडणुकीसंबंधी एनबीसी/डब्ल्युएसजेनेही एक सर्वेक्षण केले होते. त्यातही जो बायडेन ट्रम्प यांच्यापेक्षा पुढे असल्याचं दिसत आहे. सर्वेक्षणात जो बायडेन यांना 51 टक्के लोकांनी पाठिंबा दिला आहे, तर ट्रम्प यांना केवळ 40 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. अशा अनेक सर्वेक्षणात ट्रम्प पिछाडीवर पडले आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोरोना विषाणूविरोधात लढताना येत असलेले अपयश या महत्वाचा मुद्दा बनला आहे. अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा दोष अनेक अमेरिकी नागरिकांनी ट्रम्प यांना दिला आहे. शिवाय सातत्याने खालावल जाणारी अर्थव्यवस्था, बेरोजगारी असे मुद्दे जोर पकडत आहेत. 

अमेरिकेतील तज्ज्ञानुसार बायडेन आणि ट्रम्प यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. कोरोना विषाणू आणि अर्थव्यवस्था यासोबत चीन हाही मुद्दा निवडणुकीसाठी महत्वाचा ठरत आहे. दोन्ही उमेदवारांनी चीनवर आगपाखड सुरु केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी तर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि त्यांच्या कम्युनिस्ट पक्षावर वारंवार निशाणा साधला आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूच्या उद्रेकाला ट्रम्प यांनी चीनला जबाबदार धरलं आहे.

पुण्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर...
दरम्यान, 3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात पार पडणाऱ्या निवडणुकांना विशेष महत्व आले आहे. कोरोनाने असामान्य आणि अभूतपूर्व परिस्थिती निर्माण केली आहे. शिवाय देशातील अर्थव्यवस्थेची स्थितीही फारशी चांगली नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा राष्ट्रपती बनण्यासाठी जोरदार संघर्ष करावा लागणार आहे.

अमेरिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US election Donald Trumps path to the presidency is tough