बंदूक, अॅबॉर्शन आणि रिपब्लिकन्स

अभिजीत शिरगुरकार, अलाबामा, अमेरिका
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

अमेरिकेत दोन प्रमुख पक्ष. पहिला रिपब्लिकन उर्फ GOP (Grand Old Party) तर दुसरा डेमोक्रॅटिक. या दोन्ही पक्षातले पारंपरिक मतभेद म्हणजे गन कंट्रोल, एबॉर्शन, ग्लोबलायझेशन, वातावरणातील बदल इत्यादी. 

 

मी अमेरिकेतल्या अलाबामा राज्यात राहतो. अलाबामा राज्य रिपब्लिकन पक्षाचे खंदे राज्य.

जसे आपल्याकडे दादर म्हणजे शिवसेना तसेच अलाबामा म्हणजे रिपब्लिकन. मी ज्या कंपनीमध्ये काम करतो, तिकडचे माझे सहकारी कट्टर रिपब्लिकन आहेत. इथे डेमोक्रॅटिक पक्षाचे कार्यकर्ते, नेते मंडळी प्रचार करायला फिरकत पण नाहीत. अलाबामा हे राज्य अमेरिकेच्या बायबल बेल्टमध्ये आहे. शेजारचे मिसिसिपी, जॉर्जिया, टेनेसी, लुईझियाना राज्यांमध्ये अत्यंत धार्मिक ख्रिश्चन लोक राहतात. मी ज्या शहरात राहतो तिथे चौकाचौकात चर्च आहेत. दर रविवारी सगळ्या चर्चेसमध्ये अलोट गर्दी असते.

अमेरिकेत दोन प्रमुख पक्ष. पहिला रिपब्लिकन उर्फ GOP (Grand Old Party) तर दुसरा डेमोक्रॅटिक. या दोन्ही पक्षातले पारंपरिक मतभेद म्हणजे गन कंट्रोल, एबॉर्शन, ग्लोबलायझेशन, वातावरणातील बदल इत्यादी. 

पहिला घेऊ गन कंट्रोलचा प्रश्न. जेव्हा अमेरिका तयार होत होती तेव्हा त्यांच्या संविधानकर्त्यांनी प्रत्येक व्यक्तीस बंदूक बाळगायला मुक्त परवानगी दिली. अर्थात ती त्यावेळची गरज होती कारण त्या काळी लॉ अँड ऑर्डर अस्तित्वात नव्हती. ही बंदूक स्वतःच्या बचाव करण्यासाठी दिली होती. संविधानात हे सेकण्ड अमेन्डमेंटमध्ये लिहिलेले आहे. पण आता परिस्थिती खूपच बदलली आहे. पोलिस आले, चांगले नियम आले. खरं तर बंदुकीची गरज भासायला नको. पण म्हणतात ना भित्या पाठी ब्रम्हराक्षस. इथे कोणालाच आपली बंदूक बाळगण्याची हौस सोडायची नाहीये. जे बंदूक बाळगतात त्यांच्या घरी अजिबात चोरी होत नाही हा समज. विशेषतः रिपब्लिकन पक्षाचा. त्यांना आपल्या गन्सला हात लावलेला अजिबात चालत नाही. डेमोक्रॅटिक पक्षाला कोणाला कुठली बंदूक द्याची यावर नियंत्रण हवंय. 

दुसरा प्रश्न अॅबॉर्शनचा. आधी सांगितल्याप्रमाणे बायबल बेल्ट म्हणजे कट्टर ख्रिश्चन लोकांचा प्रदेश. त्यांना अॅबॉर्शन करणं म्हणजे देवांनी निर्माण केलेल्या जीवाचा जीव घेणं वाटतं. होणाऱ्या आईचा जीव वैद्यकीय दृष्ट्या धोक्यात असला तरी अॅबॉर्शन हे महापाप. म्हणूनच इथल्या लोकांना अॅबॉर्शन हे धर्म विरोधी वाटतं. डेमोक्रॅटिक पक्षाचा याला ठाम विरोध. त्यांच्या मते होणारं बाळ जन्माला आलंच नसेल तर त्याच्या जीवापेक्षा त्याची जिवंत आई महत्वाची. वास्तविक हा विषय दोन राजकीय पक्षांनी ना सोडवता होणारी आई आणि डॉक्टर यांनी सोडवला पाहिजे पण अॅबॉर्शन म्हटलं की धर्म आला आणि धर्म म्हंटलं की राजकारण आलं.  

रिपब्लिकन पक्ष हा कॉन्सर्व्हेटिव्ह म्हणजेच पुराणमतवादी म्हणून ओळखला जातो. आपण बरे आणि आपला देश बरा. या लोकांना ग्लोबलायझेशनबद्दल तिटकारा वाटतो. कोणी बाहेरचे आले की यांच्या कपाळावर आठ्या पडल्याच म्हणून समजा. कधी कधी त्यांची ही विचारसरणी वर्णद्वेषापर्यंत पोचते. यांत थोडाफार तथ्यही आहे. रिपब्लिकन पक्ष्याचे पुरस्कर्ते, प्रचारक, नेते हे सर्व व्हाईटस् म्हणजेच गोरे लोक असतात. त्याउलट डेमोक्रॅटिक पक्षात विविधता दिसून येते. बरेच काळे, हिस्पॅनिक लोकांचा डेमोक्रॅटिक पक्षाला पाठिंबा असतो. रिपब्लिकन पक्षाला विशेषतः ट्रम्प साहेबांना मेक्सिकोतून बेकायदेशीररित्या आलेल्या लोकांना हुसकवायचे आहे. येणाऱ्या लोकांना थांबवायचे आहे. त्यासाठी ट्रम्प महाशय एक मोठी भिंत अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवर बांधणार आहेत! 

क्लायमेट चेंजबाबतीत तर रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षात पराकोटीचे मतभेद आहेत. रिपब्लिकन पक्ष तर क्लायमेट चेंज होतोय हे मानायला तयारच नाहीये. त्यांच्या मते हे सर्व थोतांड आहे. अमेरिकेत विक्रमी उच्च तापमानाची नोंद होत गेलीये. आता नोव्हेंबर चालू झालाय पण अजूनही नेहमीसारखा हिवाळा चालू झालेला नाहीये. जगभरातल्या बऱ्याच सायंटिस्ट लोकांनी व राजकीय नेत्यांनी मानला आहे की पृथ्वीचे तापमान वाढतंय, उत्तर आणि दक्षिण ध्रृवांवरचा बर्फ वितळतोय तरी रिपब्लिकन पक्ष मान्यच करत नाहीये. एका क्लायमेट चेंजवरच्या चर्चेमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या एका मोठ्या नेत्यांनी बाहेरून बर्फ आणून दाखवला आणि विचारले हा बघा बर्फ...कुठे वितळतोय सांगा !! काय म्हणावं या मूर्खपणाला ? 

थोडा फार कॉमन सेन्स असलेल्या माणसाला रिपब्लिकन पक्षाची ही धोरण अतर्क्य वाटणं स्वाभाविक आहे. अलाबामा राज्यात तशी आहेत थोडीफार माणसं जे डेमोक्रॅटिक पक्षाला पाठिंबा देतात पण खूपच कमी. म्हणूनच की काय या राज्याचा विकास हवा तसा झालेला नाहीये. अलाबामाच का इतर शेजारची राज्य सुद्धा तशी गरीबच. असो...तर एकुणात हे झाले अलाबामाचे  राजकीय अवलोकन. कामाच्या ठिकाणी मी कधी हे राजकीय विषय काढत नाही. कारण माझे सर्व सहकारी रिपब्लिकन आहेत. त्यामुळे मी पण कामाच्या ठिकाणी रिपब्लिकनपणा करतो - आपण बरे आणि आपलं  काम बरं !!

Web Title: US Election policies of Republican party