सीरियामध्ये अमेरिकेचे हल्ले; नव्या शीतयुद्धाची सुरवात?

वृत्तसंस्था
Saturday, 14 April 2018

वॉशिंग्टन : सीरियाचे वादग्रस्त अध्यक्ष बशर अल असाद यांच्या सैन्याकडे असलेल्या रासायनिक शस्त्रांना लक्ष्य करत अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने आज (शनिवार) हवाई हल्ले केले. सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये स्फोट झाल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बशर अल असाद यांच्या राजवटीला लक्ष्य करण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचा सामरिक तज्ज्ञांचा अंदाज आहे. यातून पुन्हा एकदा शीतयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. 

वॉशिंग्टन : सीरियाचे वादग्रस्त अध्यक्ष बशर अल असाद यांच्या सैन्याकडे असलेल्या रासायनिक शस्त्रांना लक्ष्य करत अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने आज (शनिवार) हवाई हल्ले केले. सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये स्फोट झाल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बशर अल असाद यांच्या राजवटीला लक्ष्य करण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचा सामरिक तज्ज्ञांचा अंदाज आहे. यातून पुन्हा एकदा शीतयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रात्री व्हाईट हाऊसमधून राष्ट्राला उद्देशून भाषण केले. 'सीरियाचे हुकूमशाह बशर अल असाद यांच्याकडे असलेल्या रासायनिक शस्त्रांना लक्ष्य करत हल्ले करण्याचे आदेश मी काही वेळापूर्वी अमेरिकेच्या लष्कराला दिले आहेत', असे ट्रम्प यांनी जाहीर केले. एका अमेरिकी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा वापर करत सीरियातील विविध ठिकाणी हल्ले करण्यात आले आहेत. 

Image may contain: airplane and sky

असाद यांच्या राजवटीला पाठिंबा देणाऱ्या रशिया आणि इराण या दोन देशांवरही ट्रम्प यांनी कडाडून टीका केली. 'निष्पाप पुरुष, महिला आणि लहान मुलांची सामूहिक हत्या करणाऱ्या राजवटीशी संबंध ठेवताना काही वाटत कसे नाही, असे मला इराण आणि रशिया या दोन्ही देशांना विचारायचे आहे', असे ट्रम्प त्या भाषणात म्हणाले. 

दरम्यान, अमेरिकी लष्कराच्या सज्जतेनंतर ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांनीही त्यांच्या लष्कराला हल्ल्याचे आदेश दिले. 'सीरियामधील गृहयुद्धात हस्तक्षेप करण्यासाठी किंवा तेथील राजवट उलथवून टाकण्यासाठी हे हल्ले नाहीत', असेही मे यांनी सांगितले. 'संहारक रासायनिक शस्त्रे निर्माण करण्याची सीरियाची क्षमता संपविण्यासाठी फ्रान्सने या हल्ल्यांमध्ये अमेरिका आणि ब्रिटनची साथ दिली आहे', असे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जाहीर केले. 

'येथील एक वैद्यकीय प्रयोगशाळा आणि लष्करी तळावर अमेरिका आणि त्यांच्या मित्रदेशांनी हल्ले केले आहेत', असे सीरियातील मानवी हक्क आयोगाच्या निरीक्षकांनी सांगितले. 

सीरियाचे उत्तर..! 
सीरियाच्या लष्कराने जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे सोडत अमेरिका आणि मित्र देशांच्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेचा हल्ला जवळपास एक तासभर चालू होता.

हा हल्ला संपल्यानंतर असंख्य नागरिक दमास्कसच्या रस्त्यांवर जमा झाले. सीरिया, रशिया आणि इराणचे झेंडे फडकावित त्यांनी निदर्शने केली. सीरियातील सरकारी वाहिनीने ही निदर्शने थेट प्रसारित केली.

Image may contain: 3 people, people smiling, car and outdoor

Image may contain: 9 people, people standing, crowd and outdoor

Image may contain: 2 people, outdoor

रासायनिक शस्त्रांचा वापर केल्याचा आरोप सीरियातील सरकारने आतापर्यंत सातत्याने फेटाळला आहे. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचा एक गट रासायनिक शस्त्रांच्या पाहणीसाठी सीरियामध्ये दाखल झाला आहे. हा गट आज (शनिवार) दमास्कसमधून दौमा या शहरात पाहणी करणार होता. दौमा याच शहरामध्ये 40 नागरिकांचा रासायनिक शस्त्रांच्या वापरामुळे मृत्यू झाल्याचा आरोप अमेरिका आणि मित्र देशांनी केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US, France and Britain strike Syria chemical weapons site