अमेरिकेची पाकिस्तानला सशर्त मदत

पीटीआय
रविवार, 4 डिसेंबर 2016

अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होत असेल, अशाच कारवायांमध्ये पाकिस्तानला सुरक्षाविषयक मदत केली जाईल, यावर विधेयकात भर देण्यात आला आहे. - जॉन मॅककेन, अध्यक्ष, सिनेट संरक्षण सेवा समिती

हक्कानी नेटवर्कविरोधात कारवाईची अट, 90 कोटी डॉलर मिळणार
इस्लामाबाद - अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाने पाकिस्तानला 90 कोटी डॉलरची आर्थिक व अन्य साहाय्यासाठी मदत करणारे विधेयक मंजूर केले आहे. "हक्कानी नेटवर्क' या दहशतवादी गटाविरोधात पाकिस्तान करत असलेल्या कारवाईवर ही मदत अवलंबून असणार आहे.

प्रतिनिधिगृहात 2017 साठीचे अमेरिकी राष्ट्रीय संरक्षण अधिकार विधेयक संमत झाले. यात 1.1 अब्ज डॉलरची भरपाईची तरतूद करण्यात आली आहे. यातील 90 कोटी डॉलर भरपाई पाकिस्तानला मिळणार आहे. मात्र, याला संसदेची अधिसूचना आवश्‍यक असणार आहे. पाकिस्तान हक्कानी नेटवर्कविरोधात करीत असलेली कारवाई समाधानकारक असल्यास अमेरिकी संरक्षण मंत्रालय याला हिरवा कंदील दाखविणार आहे. यानंतरच प्रत्यक्ष मदत पाकिस्तानला मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
पाकिस्तानमधील "डॉन' वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, एकूण मदतीपैकी 45 कोटी डॉलर मदत देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाची संमती आवश्‍यक आहे. या वर्षी पाकिस्तानला 30 कोटी डॉलर मदत देण्यात येणार होती. मात्र, अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऍश्‍टन कार्टर यांनी पाकिस्तानला मदत देण्यास संमती न दिल्याने ही मदत मिळाली नाही.

प्रतिनिधिगृहात काल संमत झालेले विधेयक पुढील आठवड्यात सिनेटमध्ये मांडण्यात येणार आहे. हे विधेयक कोणत्याही विरोधाविना मंजूर होण्याची शक्‍यता आहे. या विधेयकात म्हटले आहे, की अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात आर्थिक आणि सुरक्षाविषयक संबंध गुंतागुंतीचे आहेत. दोन्ही देशांच्या सकारात्मक आणि परस्पर सामंजस्याच्या भागीदारीचा ते पाया आहेत.

Web Title: US help to Pakistan conditional