US moves missile defence to South Korea site amid tensions with North
US moves missile defence to South Korea site amid tensions with North

अमेरिकेची क्षेपणास्त्रप्रणाली दक्षिण कोरियात

सोल - आण्विक महत्त्वाकांक्षेमुळे फुरफुरलेल्या उत्तर कोरियाला लगाम घालण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला असून, अमेरिकी लष्कराने दक्षिण कोरियामध्ये क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली तैनात करण्यास सुरवात केली आहे.

अमेरिकेच्या "टर्मिनल हाय ऍल्टिट्यूड एरिया डिफेन्स सिस्टीम'च्या (थाड) तैनातीमुळे उत्तर कोरियावरचा दबाव वाढणार आहे. या क्षेपणास्त्रप्रणालीच्या तैनातीबाबत मागील वर्षीच अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये करार झाला होता, उत्तर कोरियाकडून होणाऱ्या संभाव्य क्षेपणास्त्र हल्ल्यांना तोंड देण्यासाठी ही यंत्रणा तैनात केली जाणार होती. चीनने मात्र या क्षेपणास्त्र प्रणालीच्या तैनातीस आक्षेप घेतला असून, यामुळे प्रादेशिक सुरक्षिततेचे संतुलन बिघडेल, असा दावा चिनी सरकारकडून करण्यात आला आहे. दरम्यान, या अमेरिकी क्षेपणास्त्र प्रणालीच्या तैनातीस स्थानिकांनी मात्र विरोध केला आहे. 

अमेरिकेचा आग्रह 
"थाड' प्रणाली तातडीने कार्यान्वित व्हावी म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत, या वर्षाच्या अखेरपर्यंत बॅटरी बसविण्याचे कामही पूर्ण होईल, असे दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील महिन्यामध्ये दक्षिण कोरियात अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याने त्याआधी हा मुद्दा मार्गी लागावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या क्षेपणास्त्र प्रणालीच्या तैनातीस पाठिंबा देणाऱ्या उमेदवारांनाच मैदानात उतरविण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत. 

पर्यटक घटले 
चीन सरकारने "थाड'च्या तैनातीस विरोध करत दक्षिण कोरियावर अघोषित बहिष्कारच टाकला आहे. चीनच्या या बहिष्कारामुळे दक्षिण कोरियातील चिनी पर्यटकांची संख्याही घटली आहे. मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वेध घेऊन ते हवेतच नष्ट करण्याची क्षमता "थाड'मध्ये आहे. मध्यंतरी उत्तर कोरियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. 

चीनची विमानवाहू युद्धनौका 
दक्षिण कोरियासोबतच्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चीन सरकारने आपली पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका तयार केली आहे. ईशान्येकडील "दलाईन' बंदरामध्ये या नौकेची बांधणी करण्यात आली आहे. 2020 पर्यंत ही युद्धनौका पाण्यामध्ये उतरविली जाणार नसल्याचे बोलले जाते. दक्षिण चिनी समुद्रातील आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी चीन या नौकेचा आधार घेऊ शकतो. परकी संरक्षण विश्‍लेषक, चिनी माध्यमांनी या नव्या नौकेची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com