"एअरफोर्स वन'जवळ आलेल्या विमानाची चौकशी...

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

एअरफोर्स वन हे अमेरिकेच्या सर्वोच्च लष्करी सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते. या पार्श्‍वभूमीवर, या घटनेची चौकशी करण्यात येत आहे

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे औपचारिक वाहन असलेल्या "एअरफोर्स वन'जवळ अचानक एक विमान आल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येत आहे. ही घटना फ्लोरिडामध्ये घडली होती.

एअरफोर्स वनपासून दोन नॉटिकल मैलांच्या परिसरात येण्याची परवानगी कोणत्याही विमानास दिली जात नाही. मात्र गेल्या तीन फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेमध्ये एक खासगी विमान एअरफोर्सच्या नजीक आल्याचे आढळून आले होते. ही दोन विमाने समांतर रेषेत प्रवास करत असल्याने धडक होण्याचा धोका नव्हता. एअरफोर्स वनमधून प्रवास करत असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुरक्षितरित्या पाम बीच विमानतळावर पोहोचले.

एअरफोर्स वन हे प्रवास करत असताना त्याच्या सुरक्षेसाठी विविध यंत्रणा कार्यान्वित असतात. या विमानात राष्ट्राध्यक्षांच्या वापरासाठी प्रत्येकी 4 हजार चौरस फुटांचे तीन मजले बांधण्यात आले आहेत. याशिवाय सुसज्ज वैद्यकीय कक्षासहित पत्रकार, इतर पाहुणे, सुरक्षा कर्मचाऱ्यांसहित व्हाईट हाऊसमधील इतर कर्मचाऱ्यांसाठीही एअरफोर्स वनमध्ये विविध कक्ष बांधण्यात आले आहेत. एअरफोर्स वन हे अमेरिकेच्या सर्वोच्च लष्करी सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते. या पार्श्‍वभूमीवर, या घटनेची चौकशी करण्यात येत आहे.

Web Title: US probes plane that got too close to Air Force One