पाकला वेसण घाला: तज्ज्ञांचा अमेरिकेला सल्ला

पीटीआय
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

अमेरिकेपुढे असलेल्या पाकिस्तानविषयक धोरणाच्या पर्यायांचे पुन्हा एकदा परीक्षण व्हावे. उदाहरणार्थ, पाकिस्तानमध्ये आश्रय घेणाऱ्या तालिबानविरोधात पाकिस्तानच्या पाठिंब्याने वा पाकच्या संमतीशिवायही कारवाई करणे शक्‍य आहे

वॉशिंग्टन - अमेरिकेकडून सध्या राबविण्यात येणाऱ्या पाकिस्तानसंदर्भातील धोरणाचा फेरआढावा घेण्यात यावा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय राजकारणामधील विविध विषयांशी संबंधित असलेल्या तज्ज्ञांनी अमेरिकन लोकप्रतिनिधींस केले आहे. भारतासारख्या शेजारी देशांवर हल्ला करणाऱ्या दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचे धोरण पाकिस्तानने बदलले नाही; तर या देशातील दहशतवाद्यांच्या तळांवर थेट हल्ले करण्याच्या पर्यायाचाही अमेरिकेने विचार करावा, असे मत या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

व्हाईट हाऊस परराष्ट्र समिती व कॉंग्रेस यांच्याकडून गेल्या काही वर्षांत पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या लष्करी सहाय्यामध्ये घट करण्यात आली असून यामुळे पाकला मिळणाऱ्या परदेशी निधीवर अर्थातच निर्बंध आल्याची माहिती रॅंड कॉर्पोरेशन या प्रभावी थिंक टॅंकमधील आंतरराष्ट्रीय सुरक्षा व संरक्षण धोरण केंद्राचे संचालक असलेल्या सेठ जी जोन्स यांनी म्हटले आहे. मात्र अमेरिकेकडून पाकिस्तानला सद्यस्थितीत पुरविण्यात येत असलेल्या निधीमध्ये आणखीही घट होणे शक्‍य असल्याचे जोन्स यांनी स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानमधील निवडक संघटना व व्यक्तींविरोधात नेमके आर्थिक निर्बंध लादण्याचा पर्यायही जोन्स यांनी यावेळी बोलताना मांडला. ""अमेरिकेपुढे असलेल्या पाकिस्तानविषयक धोरणाच्या पर्यायांचे पुन्हा एकदा परीक्षण व्हावे. उदाहरणार्थ, पाकिस्तानमध्ये आश्रय घेणाऱ्या तालिबानविरोधात पाकिस्तानच्या पाठिंब्याने वा पाकच्या संमतीशिवायही कारवाई करणे शक्‍य आहे,'' असे जोन्स म्हणाले.

"भारताकडून पाकिस्तानच्या भोवती राजनैतिक प्रभावाचे वर्तुळ (स्ट्रॅटेजिक एनसर्कलमेंट) तयार करण्यात येईल, या भीतीमुळे पाकिस्तानमध्ये आश्रय घेणाऱ्या अफगाण तालिबानविरोधात कारवाई करण्यास पाक अनुत्सुक असल्याचे मत ब्रुकिंग्ज इन्टिट्यूशन या अन्य एका प्रसिद्ध थिंक टॅंकशी संबंधित असणारे तज्ज्ञ वंडा फेल्बाब ब्राऊन यांनी म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर, पाकवर दबाव आणण्यासाठी अन्य पर्यायांचा विचार करण्यात यावा, अशा आशयाचे मत अन्य तज्ज्ञांनीही व्यक्‍त केले आहे.

अमेरिकेकडून इतर देशांनाही पाकिस्तानसंदर्भातील धोरण बदलण्याचे आवाहन केले जाण्याची शक्‍यता आहे.

Web Title: US should review its options for dealing with Pakistan