
USA : 'वॉशिंग्टन डीसी'वर दिसलं अज्ञात विमान; F-16 ने पाठलाग करताच मोठा अपघात
नवी दिल्लीः एक अज्ञात विमान अचानक अमेरिकेतल्या संवेदनशील भागात पोहोचलं. अमेरिकेची संसद आणि राष्ट्रपती भवनाने तातडीने अलर्ट जारी केली. त्यानंतर एफ-१६ विमानाने त्या विमानाचा पाठलाग केला अन् मोठी दुर्घटना घडली.
रविवारी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीवर अज्ञात विमान उडताना दिसलं. संवेदनशील परिसरात अचानकपणे विमान आल्याने वायुसेनेच्या एफ-१६ विमानाने उड्डाण घेऊन त्याचा पाठलाग केला. या विमानाने अज्ञात पायलटाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र विमानातून कुठलंच उत्तर मिळालं नाही.
शेवटी ते अज्ञात विमान वॉशिंग्टन डीसीच्या जवळ असलेल्या वर्जिनियाच्या जंगलामध्ये कोसळलं. अमेरिकेच्या वायुसेनेने याबद्दल खुलासा करत आम्ही विमानावर निशाणा साधला नसल्याचं म्हटलं आहे. यूएस नॉर्थ अमेरिकन डिफेन्स कमांडने सांगितलं की, एफ-१६ जेटने विमानाच्या पायलटचं लक्ष विचलीत करण्यासाठी आगीचे लोट सोडले. परंतु सगळे प्रयत्न निरर्थक झाले.
अज्ञात विमानाला अपघात झाला तेव्हा त्यात चार जण प्रवास करत होते. त्यांच्याविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही. वर्जिनिया स्टेट पोलिस यासंबंधीचा तपास करीत आहेत. रात्री उशीर झाल्याने तपास थांबवण्यात आला होता. आज सकाळी पुन्हा तपास सुरु झाला आहे.
तपासामध्ये माहिती मिळाली की, हे विमान फ्लोरिडा येथील कंपनी एनकोर मोटर्स ऑफ मेलबर्नचं होतं. कंपनीचे प्रमुख बार्बरा रुपमेल यांचे पती जॉन रुपमेल यांनी सांगितलं की, त्यांची मुलगी, नात आणि आया जहाजावर होती. हे सर्वजण न्यू यॉर्कमधील ईस्ट हॅम्पटन येथून नॉर्थ कॅरोलिना येथील त्यांच्या घरी जात होते.