अमेरिका कतारला विकणार 12 अब्ज डॉलर्सची लढाऊ विमाने

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जून 2017

या करारामुळे कतारला नेमकी किती विमाने मिळतील, याचा खुलासा पेंटॅगॉनकडून करण्यात आलेला नसला; तरी विमानांची संख्या सुमारे 36 इतकी असावी, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे

दुबई - कतार अमेरिकेकडून अत्याधुनिक एफ-15 लढाऊ विमाने विकत करण्यासंदर्भातील करार झाल्याची घोषणा आज (गुरुवार) कतारचे संरक्षण मंत्री खालिद अल अत्तियाह व अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटीस यांनी एकत्रितरित्या केली.

कतार दहशतवादाला उत्तेजन देत असल्याचा आरोप करत सौदी अरेबिया, संयुक्‍त अरब अमिरात, ईजिप्त व बहारीन या देशांनी कतारबरोबरील राजनैतिक संबंध तोडल्याचे जाहीर केले आहे. यामुळे पश्‍चिम आशियातील वातावरण तणावग्रस्त झाल्याच्या पार्श्‍वभूमीवरच हा अत्यंत संवेदनशील करार झाला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियाच्या कतारवरील बहिष्कारास पाठिंबा दर्शविला आहे. मात्र अमेरिकेमधील इतर वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेत या प्रकरणी चर्चा करण्यात यावी, अशी भूमिका घेतली आहे.

"12 अब्ज डॉलर्स किंमतीच्या या करारामुळे अमेरिका व कतारमधील संरक्षणात्मक सहकार्य अधिक वृद्धिंगत झाले आहे,'' असे पेंटॅगॉनने म्हटले आहे. मॅटीस व अत्तियाह यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेचा असलेल्या धोक्‍याचाही मुद्दा उपस्थित केला गेल्याचे वृत्त सूत्रांनी दिले.

या करारामुळे कतारला नेमकी किती विमाने मिळतील, याचा खुलासा पेंटॅगॉनकडून करण्यात आलेला नसला; तरी विमानांची संख्या सुमारे 36 इतकी असावी, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याआधी गेल्या वर्षी, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने कतारला 72 एफ-15 ईगल जेट्‌स विकण्यास मान्यता दर्शविली होती. या कराराची किंमत सुमारे 21 अब्ज डॉलर्स इतकी होती.

Web Title: USA sells f-15 jets to Qatar