हॉंगकॉंगमध्ये नागरिक रस्त्यावर; चीनमध्ये हिंसाचार

वृत्तसंस्था
रविवार, 25 ऑगस्ट 2019

हॉंगकॉंगमध्ये सुरू असलेले लोकशाहीवाद्यांचे आंदोलन थांबण्याचे नाव घेत नाही. हॉंगकॉंगमधील स्पोर्ट स्टेडियममध्ये आज पुन्हा आंदोलकांनी निदर्शने केली. अनेक दिवस शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला शनिवारी हिंसाचाराचे गालबोट लागले होते. 

हॉंगकॉंग ः हॉंगकॉंगमध्ये सुरू असलेले लोकशाहीवाद्यांचे आंदोलन थांबण्याचे नाव घेत नाही. हॉंगकॉंगमधील स्पोर्ट स्टेडियममध्ये आज पुन्हा आंदोलकांनी निदर्शने केली. अनेक दिवस शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला शनिवारी हिंसाचाराचे गालबोट लागले होते. 

मागील तीन महिन्यांपासून हॉंगकॉंगमध्ये लोकशाही समर्थक आंदोलकांची निदर्शने सुरू आहेत. हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी चीनकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. चीनच्या या प्रयत्नांना "व्हाइट टेरर' असे नाव आंदोलकांनी दिले आहे. 

हॉंगकॉंगमधील मेट्रो सेवेला नागरिकांच्या संतापाचा सामना करावा लागला आहे. चिनी माध्यमांच्या दबावापुढे झुकत मेट्रोने आंदोलन सुरू असलेल्या भागाजवळची मेट्रो स्टेशन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. निदर्शनांच्या ठिकाणी जाण्यासाठी आंदोलकांकडून मेट्रोचा वापर होत असल्याचा आरोप चीनकडून करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी आणि रविवारी आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणाच्या जवळचे स्टेशन मेट्रोकडून बंद ठेवण्यात आले होते. शनिवारी झालेल्या आंदोलनावेळी पोलिस आणि आंदोलक एकमेकांना भिडले होते. 

पोलिसांच्या नातेवाइकांची रॅली 
दरम्यान, हॉंगकॉंगमधील पोलिस कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांनीही रविवारी संध्याकाळी दुसरी रॅली काढली होती. ""पोलिसांवर सध्या प्रचंड टीका होत आहे. मात्र, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. हॉंगकॉंगच्या शत्रूंची नव्हे तर येथील जनतेची सेवा करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे,'' अशी प्रतिक्रिया रॅलीत सहभागी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Violence breaks out in Hong Kong as protesters