Breaking News : ट्रम्प समर्थकांकडून US Capitol मध्ये तोडफोड; अभुतपूर्व असा गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 January 2021

आंदोलकांनी केमिकल हल्ला केल्याचा आरोप  पोलिसांना केला आहे. 

वॉशिंग्टन : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर अद्यापही वितंडवाद सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डींगच्या बाहेर जमून मोठा गोंधळ घातला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडली आहे. या घटनेनंतर वॉशिंग्टन डिसीमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर राष्ट्राध्यक्ष पदासाठी नुकतेच निवडले गेलेल्या जो बायडन यांनी म्हटलंय की मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन करतो की त्यांनी घेतलेल्या शपथेनुसार संविधानाचे संरक्षण करावे आणि या गोंधळाला लवकरात लवकर आवरतं घ्यावं.

गेल्या 3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीच्या मतमोजणीवर संशय घेत मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तरीही या निवडणुकीत डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडन यांचाच विजय झाल्याचे चित्र होते. या निवडणुकीत झालेल्या विजयाला औपचारिकरित्या घोषित करण्यासाठी सत्र सुरु होतं. मात्र, रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी काही राज्यांतील निकालावर नाराजी व्यक्त करत प्रश्न उभे केले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपराष्ट्राध्यक्ष माइक पेंस यांच्यावर दबाव टाकत होते की त्यांनी बायडन यांना विजयाचे सर्टीफिकेट देऊ नये. अशा परिस्थितीत तणाव वाढत गेला.

जेंव्हा अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये हे सत्र सुरु होतं तेंव्हाच ट्रम्प समर्थकांच्या हिंसक झुंडीने बॅरिकेड्सची तोडफोड करत आत प्रवेश केला. पोलिसांशी त्यांची झटापट झाली. यातील अनेक समर्थकांकडे हत्यारे होती.  ट्रम्प समर्थकांनी खिडक्या तोडल्या आणि पोलिसांशी दोन हात केले. या दरम्यानच एका आंदोलक महिलेला गोळी लागून तिचा मृत्यू झाला. त्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांत राहून जाण्यास सांगितले मात्र ही गोष्ट देखील अधोरेखित केली या निवडणुकीत त्यांचाच विजय झाला आहे. 

या संपूर्ण अभूतपूर्व गोंधळामुळे बायडन यांनी आपला क्रोध व्यक्त केला आहे. विलमिंगटनमधून बोलताना त्यांनी म्हटलं की, लोकशाही अप्रत्यक्षपणे धोक्यात आहे. मी विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना विनंती करतो कि त्यांना नॅशनल टीव्हीवर जाऊन आपल्या शपथेचं पालन करावं आणि संविधानाचे संरक्षण करावं. कॅपिटलवरील या हल्ल्याला तसेच गोंधळाला समाप्त करावं. कॅपिटलमध्ये घुसून खिडक्या तोडणे, फ्लोअरवर ताबा घेणे आणि उलथापालथ माजवणे हा देशद्रोह आहे. 

ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलंय की या आंदोलनात हिंसा व्हायला नको. लक्षात ठेवा की आपण कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पक्षाचे सदस्य आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Violence at US Capitol by donald trump supportes