भारत-पाकमधील शहरांचा बनेल "स्नो-ग्लोब'

भारत-पाकमधील शहरांचा बनेल "स्नो-ग्लोब'

वाढत्या धुक्‍याबाबत पर्यावरण संस्थेचा धोक्‍याचा इशारा

वॉशिंग्टन : उत्तर भारत आणि पाकिस्तानमधील धुक्‍याने वेढलेल्या शहरांमध्ये धोकादायक हवा प्रदूषणाची ही पातळी आणखी काही महिने अशीच राहणार असल्याचा अंदाज अमेरिकेतील पर्यावरणविषयक संस्थेने व्यक्त केला आहे. आरोग्याला हानिकारक अशा या वातावरणामुळे या शहरांना "स्नो-ग्लोब'चे स्वरूप प्राप्त होईल, असा धोक्‍याचा इशाराही या संस्थेने दिला आहे.

राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतातील काही शहरांमध्ये गेल्या आठवड्यापासून विषारी धुके सर्वत्र पसरले असल्याने प्रशासनाने बांधकामांवर तात्पुरती बंदी घातली असून, काही वेळा शाळाही बंद ठेवल्या आहेत. पाकिस्तानमध्येही काही शहरांमध्ये असेच खराब वातावरण असून, धुक्‍यामुळे गेल्या महिनाभरात सहाशे विमान उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. याबाबत अमेरिकेतील नॅशनल ओशनिक अँड ऍटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशन (एनओएए) या संस्थेने निरीक्षणे नोंदविली आहेत. या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, उत्तर भारत आणि पाकिस्तानमध्ये धुके तयार होण्याच्या कालावधीची ही सुरवात आहे. मॉन्सूनचा प्रभाव कायम असल्याने थंड हवेमध्ये प्रदूषित धुके तयार होण्यास मोठा वाव आहे आणि यामुळे येथील शहरांची स्थिती काचेच्या हिमगोलाप्रमाणे होईल आणि हे आरोग्यास अधिक हानिकारक असेल. "एनओएए'ने उपग्रहांतून घेतलेली छायाचित्रे प्रसिद्ध करत प्रदूषित वातावरणाची कारणेही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इंधन ज्वलन, पिके जाळणे ही प्रदूषणाची प्रमुख कारणे असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

थंड हवेचा परिणाम
हवा प्रदूषित राहण्यासाठी केवळ मानवनिर्मित कारणेच कारणीभूत ठरत नाहीत, तर विशिष्ट हवामानामुळे प्रदूषित हवा वातावरणात तशीच राहून त्यामध्ये आणखी धूलिकण मिसळतात. गरम हवेचा थर थंड हवेच्या वर साचून राहतो. यामुळे थंड हवेला वर जाता येत नाही. या थंड हवेमधील ओलसर कणांमध्ये विषारी धूलिकण शोषून घेतले जातात आणि हा जाड धुक्‍याचा थर कायम खालील बाजूस राहतो. यामुळे ही हवा थेटपणे श्‍वासावाटे शरीरात घेतली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com