मंगळावर मानवाचे पाऊल अद्याप दूरच...

वृत्तसंस्था
रविवार, 16 जुलै 2017

खासगी संस्थांची तयारी
"स्पेस एक्‍स' आणि "ब्ल्यू ओरिजिन्स' यांसारख्या खासगी अंतराळ संशोधन संस्था मंगळावर यान उतरविण्याची तयारी करीत आहेत. 2025 पर्यंत मंगळावर मानवाचे पाऊल पडेल, असे या संस्थांनी पूर्वीच जाहीर केले असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

पुरेशा निधीअभावी "नासा'ने गुंडाळली मोहीम; चांद्र मोहिमेकडे पुन्हा लक्ष

वॉशिंग्टन: लाल रंगाच्या मंगळ ग्रहाबद्दल मानवांमध्ये कुतूहल असते. पृथ्वीच्या जवळ असलेल्या या मंगळाचे अस्तित्व अगदी पत्रिकेतही दिसते. पृथ्वीसदृश वातावरण असल्याचे पुरावे मिळत असल्याने मंगळाच्या संशोधनात अमेरिका, भारत यांच्या अवकाश संस्थांनी पुढाकार घेतला आहे. मंगळावर मानवाला पाठविण्याचे स्वप्न अमेरिकेने पाहिले व त्यादृष्टीने तेथील अवकाश संशोधन संस्था "नासा'ने तयारीही सुरू केली होती; पण आता त्यांनी ही मोहीम गुंडाळण्याचे जाहीर केले असून, यासाठी अपुऱ्या निधीचे कारण दिले आहे.

"अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्‍स अँड ऍस्ट्रोनस्टस' यांची बैठक बुधवारी (ता. 12) झाली, त्यात "नासा' मानवाला मंगळावर कधी उतरविणार याबद्दल प्रश्‍न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना पुरेशा निधीअभावी मंगळावर मानवाला पाठविण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम थांबविण्यात येणार असल्याचे "नासा'ने जाहीर केले, असे वृत्त "डेक्कन क्रॉनिकल'ने दिले आहे. याबाबत बोलताना "नासा'च्या मानवसहित अंतराळ उड्डाण मोहिमेचे प्रमुख विल्यम जरस्टेनरमेअर म्हणाले, ""निधीची कमतरता असताना मानवासह मंगळ मोहिमेच्या तारखा जाहीर करणे शक्‍य नाही. तुटपुंज्या पैशांत मानवाला मंगळावर पाठविण्याचे स्वप्न साकार करणे सोपे नाही. या मोहिमेसाठी आर्थिक तरतुदीत दोन टक्के वाढ केली असली तरी ती अपुरी आहे. मंगळावर मानवासह यान उतरवण्यासाठी सुयोग्य पृष्ठभाग उपलब्ध नाही, त्यामुळे तेथे यान उतरविणे हे आव्हानात्मक आहे. मंगळावर पाठविण्यात येणाऱ्या यानाचे वजन सुमारे 20 टन असेल. यापूर्वी तेथे पाठविण्यात आलेल्या बग्गीपेक्षा ते 20 पटीने जास्त असेल.''


"मानवसहित मंगळ मोहिमेपेक्षा चंद्रावर मानवाला पाठविण्याची मोहीम "नासा' पुन्हा आखण्याची शक्‍यता आहे. अर्थकारणाच्या दृष्टीनेही ते योग्य ठरेल. जर चंद्रावर पाण्याचे अस्तित्व आढळले, तर त्याविषयी अधिक संशोधन करण्यास आम्हाला अधिक वाव आहे. चांद्र मोहिमेत सखोल संशोधन करण्याची आमची क्षमता असून, त्यासाठी पाठिंबाही आहे.''
- विल्यम जरस्टेनरमेअर, "नासा'च्या मानव अंतराळ उड्डाण मोहिमेचे प्रमुख

Web Title: washington news Man's footsteps on Mars