अमेरिकेतील भारतीयांमुळेच संबंध दृढ; एस. जयशंकर

जयशंकर यांचे प्रतिपादन; अमेरिकेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद
एस. जयशंकर
एस. जयशंकर sakal

वॉशिंग्टन : गेल्या दोन दशकांमध्ये भारत आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये अमूलाग्र बदल झाला असून या दृढ होत गेलेल्या भागीदारीमागे मानवी संबंध, म्हणजेच येथील भारतीय नागरिक हा सर्वांत महत्त्वाचा घटक ठरला आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज केले. अमेरिका दौऱ्यावर असलेल्या जयशंकर यांनी हॉवर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जयशंकर म्हणाले की, ‘‘भारत-अमेरिका यांच्यात धोरणात्मक सहकार्य, संरक्षण, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि इतर अनेक क्षेत्रांमधील संबंधांत गेल्या दोन दशकांत प्रचंड बदल झाला आहे. या भागीदारीचा जागतिक घडामोडींवर प्रभाव पडत आहे.

या बदलाला मानवी घटक कारणीभूत आहे. अमेरिकेत राहणारे ४४ लाख भारतीय नागतिक हे खऱ्या अर्थाने भारताचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्यामुळेच अमेरिकेबरोबरील भागीदारी दृढ होण्यास मदत झाली आहे. या सर्वांच्या केंद्रस्थानी आमचे विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि व्यावसायिक आहेत. त्यांनी दोन देशांना जोडण्याचे काम करतानाच अमेरिकेच्या विकासातही मोलाचे योगदान दिले. हे संबंध आणखी वृद्धींगत होण्यासाठी अमेरिकी विद्यार्थ्यांनीही भारत आणखी समजून घ्यावा. आमच्या लोकांना इथे अधिक आपलेपणा वाटला तर आपण खरोखरच नैसर्गिक मित्र बनू.’’

राजनाथसिंह हवाई बेटांवर

होनोलुलू : अमेरिका दौऱ्यावर आलेले संरक्षण मंत्री राजनाथसिंह हे आज अमेरिकेच्या हवाई बेटांवर आले. होनोलुलू येथील अमेरिकी लष्कराच्या हिंद-प्रशांत विभागाच्या मुख्यालयाला त्यांनी भेट दिली. अमेरिकी लष्कराचा हा विभाग आणि भारतीय लष्कर यांच्यात अनेकदा संयुक्त युद्धसराव, प्रशिक्षण कार्यक्रम आणि माहितीची देवाणघेवाण होत असते. हिंद-प्रशांत क्षेत्रात चीन आपले लष्करी वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका आणि इतर काही देश या क्षेत्रात मुक्त, खुल्या आणि आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारित यंत्रणा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com