
असोसिएटेड प्रेस ही वृत्तसंस्था आणि द न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राला युक्रेन युद्धाच्या वार्तांकनाबद्दल यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे.
Ukrain War Journalism : युक्रेन युद्धाच्या वार्तांकनाबद्दल एपी, न्यूयॉर्क टाइम्सला पुलित्झर
वॉशिंग्टन - असोसिएटेड प्रेस ही वृत्तसंस्था आणि द न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राला युक्रेन युद्धाच्या वार्तांकनाबद्दल यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकी पोलिसाच्या अमानुष अत्याचारामुळे बळी गेलेला कृष्णवर्णी नागरिक जॉर्ज फ्लॉइड याच्यावरील पुस्तकाची सर्वसाधारण बिगर काल्पनिक कथा विभागात निवड झाली.
पत्रकारिता विभागातील बहुतांश पुरस्कार रशियाच्या युक्रेनवरील आक्रमण तसेच अमेरिकेतील गर्भपातविषयक निर्बंधांशी संबंधित वार्तांकनासाठी देण्यात आले. द असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला जनसेवा आणि ब्रेकिंग न्यूज छायाचित्रण अशा दोन विभागांत बहुान मिळाला. रशियाने मारीउपोलवर ताबा मिळविल्यानंतर तेथील परिस्थइती दर्शविणाऱ्या छायाचित्र मालिकेची प्रशंसा करण्यात आली. द न्यूयॉर्क टाइम्सला आंतरराष्ट्रीय वार्तांकनासाठीचा पुरस्कार जाहीर झाला. युक्रेनमधील बुचा शहरात रशियन सैनिकांनी केलेल्या हत्यांचे वार्तांकन या दैनिकाने केले.
पत्रकारितेसाठी १५ विभागांत, तर पुस्तके, संगीत आणि नाट्य अशा क्षेत्रांतील कलाविषयक आठ गटांत पुरस्कार देण्यात आले. जनसेवेसाठीच्या पुरस्काराबद्दल सुवर्णपदक प्रदान केले जाते. इतर सर्व विजेत्यांना प्रत्येकी १५ हजार डॉलरचे पारितोषिक दिले जाते. वृत्तपत्र प्रकाशत जोसेफ पुलित्झर यांच्या प्रेरणेतून हे पुरस्कार सुरु करण्यात आले. १९१७ मध्ये पहिला पुरस्कार देण्यात आला.
फ्लॉईडला एका अर्थाने मरणोत्तर सन्मान
सर्वसाधारण बिगरकाल्पनिक कथा विभागात रॉबर्ट सॅम्युएल्स आणि टोलूस ओलोरुन्नीपा यांच्या हिज नेम इज जॉर्ज फ्लॉइड - वन मॅन्स लाईफ अँड द स्ट्रगल फॉर रेशियल जस्टीस या पुस्तकाची निवड झाली. मे २०२० मध्ये अमेरिकेतील मिनेसोटा प्रांतातील मिनीयापोलिस शहरात डेरेक शॉविन या पोलिसाच्या अमानुष अत्याचारामुळे फ्लाईड मृत्युमुखी पडला.
डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये फसवणुकीच्या प्रयत्न केल्यावरून डेरेकने फ्लॉईडला खाली पाडून त्याच्या मानेवर गुडघ्याने दाब दिला. फ्लॉईड कळवळून दयेसाठी विनवणी करीत असतानाही डेरेक मागे हटला नाही. कोरोनाची जागतिक साथ थैमान घालण्याची चिन्हे असताना या खूनामुळे जगभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या पुरस्कारामुळे फ्लॉईडला एका अर्थाने मरणोत्तर सन्मान मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
विभागवार प्रमुख मानकरी
निर्भीड वार्तांकन - द वॉशिंग्टन पोस्टच्या पत्रकार कॅरोलाईन किचनर (गर्भपातविषयक नव्या निर्बंधांमुळे जुळ्यांना जन्म देणे भाग पडलेल्या टेक्सासच्या ब्रुक अलेक्झांडर या अल्पवयीन मुलीची कथा)
विशेष लेख - द वॉशिंग्टन पोस्टच्या पत्रकार एली सॅस्लो
ब्रेकिंग न्यूज - द लॉस एंजलिस टाइम्स (वर्णभेदी वक्तव्य करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये गुप्तपणे ध्वनिमुद्रित करण्यात आलेले संभाषण उघड करणाऱ्या बातम्या)
विशेष लेखासाठी छायाचित्रण - द लॉस एंजलिस टाइम्सच्या ख्रिस्तीना हाऊस (रस्त्यावर राहणे भाग पडलेल्या २२ वर्षीय गर्भवती तरुणीची व्यथा मांडणारी छायाचित्र मालिका)
आत्मचरित्र - बेव्हर्ली गेज (एफबीआयचे दीर्घकाळ नेतृत्व केलेले अधिकारी जे. एडगर हुव्हर यांची आत्मकथा सांगणारे जी-मॅन)
स्मृतिचित्रे - हुआ शू (स्टे ट्रू)
काव्य - कार्ल फिलीप्स (देन द वॉर अँड सिलेक्टेड पोएम्स २००७-२०२०)
संगीत - संगीतनाटक ओमार (ऱ्हीयानृन गिडेन्स आणि मायकेल अबेल्स)