...मग काश्‍मीरमध्ये चिनी सैन्य घुसल्यास काय कराल?: चीनची थेट विचारणा

वृत्तसंस्था
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

भारताप्रमाणेच चीननेही भूमिका घेऊन उत्तराखंडमधील कालापानी भागामध्ये (भारत-नेपाळ-चीन ट्रायजंक्‍शन) वा थेट काश्‍मीरमध्ये (पाकिस्तानच्या वतीने) सैन्य घुसविले तर भारत काय करेल? तेव्हा ट्रायजंक्‍शनसंदर्भातील भारताची भूमिका सशक्त नाही

बीजिंग - डोकलाम येथील ट्रायजंक्‍शनजवळून भारतीय लष्कर व चिनी सैन्य एकाच वेळी मागे घेण्याचा भारताचा प्रस्ताव ठामपणे फेटाळून लावत आक्रमक चीनकडून उत्तराखंड वा काश्‍मीरमध्ये चिनी सैन्य घुसल्यास तर भारत काय करेल, अशी थेट विचारणा आज (बुधवार) करण्यात आली. चिनी परराष्ट्र मंत्रालयामधील एका ज्येष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याच्या माध्यमामधून हा नवा इशारा देण्यात आला आहे.

"ट्रायजंक्‍शनचा मुद्दा पुढे करुन भारताने स्वत:ची भूमिका रेटणे चीनला मान्य नाही. भारताच्या सीमारेषांवर अन्य ट्रायजंक्‍शनही आहेत. भारताप्रमाणेच चीननेही भूमिका घेऊन उत्तराखंडमधील कालापानी भागामध्ये (भारत-नेपाळ-चीन ट्रायजंक्‍शन) वा थेट काश्‍मीरमध्ये (पाकिस्तानच्या वतीने) सैन्य घुसविले तर भारत काय करेल? तेव्हा ट्रायजंक्‍शनसंदर्भातील भारताची भूमिका सशक्त नाही. किंबहुना या भूमिकेमुळे आणखी समस्या निर्माण होतील. यामुळे या ट्रायजंक्‍शनजवळून भारतीय सैन्याने बिनशर्त माघार घ्यावी, यानंतरच भारत व चीनमध्ये राजनैतिक चर्चा होऊ शकेल,'' अशी इशारावजा प्रतिक्रिया चिनी परराष्ट्र मंत्रालयामधील सीमारेषा आणि महासागर विभागाच्या उप संचालिका वांग वेनली यांनी व्यक्त केली आहे.

डोकलाम येथील तणावपूर्ण परिस्थिती अद्याप निवळलेली नसून संतप्त चीनकडून या पार्श्‍वभूमीवर सतत नवनवीन इशारेदेण्यात येत आहेत. चिनी सैन्याने भारतावर दबाव आणण्यासाठी तिबेट व शिनजियांगमध्ये सैन्याची आक्रमक हालचालही केली आहे. मात्र भारताकडूनही या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे.

डोकलाम घटनेचे पडसाद उत्तराखंड राज्यात उमटले आहेत. उत्तराखंडमधील चमोली येथे चीनकडून घुसखोरी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

Web Title: What if we enter Kashmir?, asks China