ट्रम्प-मिडीया युद्ध शिगेला;व्हाईट हाऊसमध्ये नाट्य

वृत्तसंस्था
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

त्यांना अप्रिय असलेले वृत्त दिले; की त्यांच्याकडून अशी कारवाई करण्यात येते. व्हाईट हाऊसचा हा निर्णय सर्वथा अमान्य आहे. अर्थात आम्हाला प्रवेश नाकारण्यात आला असला; तरी आम्ही वृत्तांकन करतच राहू

वॉशिंग्टन - बीबीसी, सीएनएन, दी न्यूयॉर्क टाईम्स आणि इतर काही महत्त्वपूर्ण वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींना "व्हाईट हाऊस'मधील माध्यम सचिव सीन स्पायसर यांच्याबरोबर होणाऱ्या अनौपचारिक वार्तालापासाठी प्रवेश नाकारण्यात आला आहे. माध्यम प्रतिनिधींना अवचितपणे नाकारण्यात आलेल्या प्रवेशामागे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच माध्यमांवर जोरदार टीकास्त्र सोडत "खोट्या बातम्या (फेक न्यूज)' म्हणजे जनेतेचे शत्रू असल्याचे म्हटले होते. विशेषत: अध्यक्षीय निवडणुकीमधील प्रचारादरम्यान ट्रम्प यांचे सहकारी हे रशियन गुप्तचर खात्याच्या संपर्कात होते, अशा आशयाच्या देण्यात आलेल्या वृत्तामुळे ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

ट्रम्प यांनी काल (शुक्रवार) केलेल्या भाषणानंतर स्पायसर यांच्याबरोबरील "प्रेस ब्रीफिंग'साठी निमंत्रित करण्यात आलेल्या पत्रकारांमध्ये केवळ एबीसी, फॉक्‍स न्यूज, ब्रेटबार्ट न्यूज, रॉयटर्स आणि वॉशिंग्टन टाईम्स या वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. "बातम्यांमधून प्रसविण्यात येणाऱ्या असत्य संकल्पनांविरोधात (नॅरेटिव्हज) व्हाईट हाऊसकडून आक्रमक कारवाई करण्यात येईल,' असे संकेत स्पायसर यांनीही दिले होते. या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

दरम्यान, अमेरिकेतील महत्त्वपूर्ण वृत्तसंस्था असलेल्या "सीएनएन'ने या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला आहे. "त्यांना अप्रिय असलेले वृत्त दिले; की त्यांच्याकडून अशी कारवाई करण्यात येते. व्हाईट हाऊसचा हा निर्णय सर्वथा अमान्य आहे. अर्थात आम्हाला प्रवेश नाकारण्यात आला असला; तरी आम्ही वृत्तांकन करतच राहू,' अशी प्रतिक्रिया सीएनएनकडून व्यक्त करण्यात आली आहे.

ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त करत दी एसोसिएटेड प्रेस, युएसए टुडे आणि टाईमच्या प्रतिनिधींनी या वार्तालापास उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. अध्यक्षीय निवडणुकीमध्ये जय मिळविल्यानंतर ट्रम्प व माध्यमांमधील संघर्ष अद्याप शमलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर व्हाईट हाऊसकडून घेण्यात आलेला हा निर्णय नव्या वादळाचे लक्षण मानले जात आहे.

Web Title: White House bans certain news media from briefing