
US : दिल्लीत जाऊन स्वतः पाहा…; भारतातील लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना अमेरिकेचा सल्ला!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन याच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जून रोजी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. यापूर्वी व्हाइट हाउसने सोमवारी भारताबद्दल एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये भारतातील लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे.
अमेरिकेने म्हटलं आहे की पीएम मोदी यांच्या राजवटीत भारतात लोकशाही जीवंत असून जर कोणाला याबद्दल शंका वाटत असेल तर ते नवी दिल्ली येथे जाऊन स्वतः पाहू शकतात. व्हाइट हाउसने त्यांच्या निवेदनात भारतातील लोकशाहीबद्दल उपस्थित शंका फेटाळल्या आहेत.
राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी न्यूयॉर्क शहरात मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. या दरम्यान व्हाइट हाऊसकडून हे वक्तव्य करण्यात आले आहे.
व्हाइट हाऊसचे प्रमुख जॉन किर्बी यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की, 'पीएम मोदी सरकारच्या काळात भारतात एक जीवंत लोकशाही पाहायला मिळत आहे. जर कोणाला याबद्दल शंका असेल तर ते नवी दिल्ली येथे जाऊन आपल्या डोळ्यांनी पाहू शकतात. मी खात्रीने सांगू शकतो का लोकशाही संस्थाचे सामर्थ्य आणि आरोग्य हा चर्चेचा भाग असेल.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या महिन्याच्या अखेरीस अमेरिकेच्या राजकीय दौऱ्यावर जाणार आहेत. २२ जून,२०२३ रोजी पंतप्रधान मोदी स्टेट डिनरमध्ये देखील सहभागी होतील.
राहुल गांधींचा मोदींवर निशाणा..
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल अमेरिकेतील प्रवासी भारतीयांना संबोधित करताना भारतीय लोकशाही दोन वेगवेगळ्या विचारधारांमध्ये विभागली गेली असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले की, भारतात दोन विचारधारांमध्ये संघर्ष सुरू आहे. एक ज्याचे आम्ही (काँग्रेस) प्रतिनिधीत्व करते तर दुसरी भाजप-आरएसएसची विचारधारा आहे. हे स्पष्ट करण्याचा सोपा माप्ग म्हणजे एकिकडे महात्मा गांधी आहेत दुसरीकडे नथुराम गोडसे.