चिंताजनक! WHO म्हणतंय, जगातील 10 पैकी एका व्यक्तीला कोरोना

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

 जगभरात कोरोनाची आकडेवारी चिंता वाढवणारी अशी आहे. आतापर्यंत जवळपास दहा लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

न्यूयॉर्क - जगभरात कोरोनाची आकडेवारी चिंता वाढवणारी अशी आहे. आतापर्यंत जवळपास दहा लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनंसुद्धा आता चिंता वाढवणारं वक्तव्य केलं आहे.

WHO चे आपत्कालीन योजनांचे प्रमुख डॉक्टर मायकल रियान यांनी म्हटलं की, गाव आणि शहरांमधील आकडे वेगवेगळे असू शकतात. तसंच वेगवेगळ्या वयोगटातील आकडेवारीही भिन्न असू शकते. याचा असा अर्थ आहे की जगातील बहुतांश लोकसंख्या कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे.

WHO ने म्हटलं की, जगातील दर दहा व्यक्तींमागे एकाला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या या दाव्यानुसार विचार केला तर जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही सध्याच्या नोंद असलेल्या रुग्णांपेक्षा 20 पट जास्त असू शकते. इतकंच नाही तर भविष्यात कोरोनाचं संकट आणखी गडद होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. 

हे वाचा - व्हाइट हाऊसमध्ये पोहोचताच ट्रम्पनी काढला मास्क; रुग्णालयातून परतल्यानंतर दिली प्रतिक्रिया

कोरोना संसर्गाशी संबंधित 34 सदस्यांच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत मायकल रियान यांनी म्हटलं की, कोरोनाचा ससंर्ग अद्याप सुरू आहे. मात्र संसर्ग रोखण्याचे आणि जीव वाचवण्याचे उपाय आहेत. मृत्यू रोखण्यात आले असून अनेक जीव वाचवता येऊ शकतात. 

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जगात 3.5 कोटी लोकांना कोरोना झाला आहे. याआधी अनेक तज्ज्ञांनी म्हटलं होतं की, नोंद झालेल्या कोरोना रुग्णांपेक्षा प्रत्यक्षातील रुग्णसंख्येचा आकडा मोठा आहे. रियान यांनी सांगितलं की, जगातील अनेक देशांमध्ये आता कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार जगात कोरोनाचे 3 कोटी 56 लाख रुग्ण असून आतापर्यंत 10 लाखाहूंन अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सर्वाधिक 76 लाख तर भारतात 66 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who says 1 person out of 10 is infected by covid 19 in world