WHO करणार चीनची चौकशी; कोरोनाचं उगम शोधण्यासाठी जाणार वूहानला

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 1 December 2020

2019 च्या उत्तरार्धात कोरोनाचा पहिला रुग्ण चीनच्या वूहानमध्ये आढळला होता. त्यांनंतर कोरोनाचा प्रसार होत तो युरोप, अमेरिका आणि संपूर्ण आशियात होत गेला.

जिनिव्हा: 2019 च्या उत्तरार्धात कोरोनाचा पहिला रुग्ण चीनच्या वूहानमध्ये आढळला होता. त्यांनंतर कोरोनाचा प्रसार होत तो युरोप, अमेरिका आणि संपूर्ण आशियात होत गेला. आज जगभर कोरोनाने लाखो लोकांचा जीव गेला आहे. सध्या बऱ्याच देशात मंदीची परिस्थिती आहे. काही देशांत तर कोरोनाची दुसरी लाट कहर करत आहे. अमेरिकेत मागील काही दिवसांपुर्वी प्रतिदिन 2 लाखांच्या आसपास रुग्ण आढळत होते. युरोपातील काही देशांतही कोरोनाचे रुग्ण मोठे प्रमाणात वाढत असल्याने तिथं पुन्हा लॉकडाउन लावलं आहे.

कोरोनाची सुरुवात झालेला चीन आता बऱ्यापैकी यातून सावरला आहे. मागील काही दिवसांत चीनच्या उत्तरेकडील प्रांतात कोरोनाचे रुग्ण आढळले होते. पण सध्या चीनमधील सगळे व्यवहार सुरु आहेत.  जागतिक आरोग्य संघटना कोरोनाचा प्रसार कसा झाला याचा शोध लावणार आहे. त्यामुळे पुढे एखादी महामारी आली तर त्याचा सामना करण्यासाठी फायदा होईल, अशी माहिती WHOचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी दिली आहे.

पुढे बोलताना घेब्रेसस म्हणाले की, याची सुरुवात चीनमधील वूहानपासून होणार आहे. लवकरच WHO वूहानमध्ये शोधमोहीम सुरू करणार आहे. त्यामध्ये तिथं काय घडलं? व्हायरसशी सुरुवात कशी झाली? या गोष्टी समोर येतील.

आली रे आली कोरोनाची लस आली! मॉडर्ना कंपनीची मोठी घोषणा

सध्या जगभरात कोरोनाच्या लशींवर काम सुरु आहे. पण अजून कोणतीच लस बाजारात आली नाही. भारतातही सध्या तीन लशी शेवटच्या टप्प्यात आहेत. कोरोना लशीसंबंधी मोठी बातमी हाती येत आहे. लस निर्मितीमध्ये आघाडीवर असणारी मॉडर्ना कंपनीची लस 94 टक्के प्रभावी ठरली आहे. कंपनी लवकरच लशीच्या आपातकालीन वापरासाठी अमेरिकेच्या अन्न आणि औषध नियामक मंडळ आणि यूरोपच्या मेडिकल एजेंसीकडे अर्ज करणार आहे. 

मॉडर्ना लशीच्या अंतिम चाचण्यांमध्ये परिणामकारक रिझल्ट मिळाले आहेत. लस 94 टक्के प्रभावी सिद्ध होत असून कोणत्याही स्वयंसेवकावर दुष्परिणाम दिसून आले नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. लशीचे अंतिम रिझल्ट हाती येताच कंपनीने लशीच्या आपातकालीन वापरसाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व काही सुरळीत राहिलं, तर एक ते दोन आठवड्यांमध्ये अमेरिकी नागरिकांसाठी लस उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे कोरोना लशी संदर्भातील ही मोठी घडामोड आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WHO will find origin of corona virus starts from Wuhan