
Explainer: कॅनडात शीख समाजाचा इतका प्रभाव कसा निर्माण झाला? जाणून घ्या कारण
Why Do Sikhs Have So Much Clout In Canada
नवी दिल्ली- कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर गंभीर आरोप केलेत. हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत सरकार असल्याचं ते म्हणाले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय.
कॅनडा आणि भारत या दोन देशांमधील राजनैतिक संबंध नाजूक बनले आहेत. खलिस्तानी समर्थकाच्या हत्येने जस्टिन ट्रुडो इतके आक्रमक का झालेत? असा प्रश्न त्यामुळे पडतो. कॅनडातील शीख लोकांचा प्रभाव हे त्यामागील कारण आहे.
हरदीप सिंग निज्जर हा शीखांसाठी वेगळा देश (खलिस्तान) असावे अशा मागणीचा पुरस्कर्ता होता. भारताने त्याच्यावर बंदी घातली होती. त्याच्या हत्येमुळे भारताकडे संशयाची सुई आली आहे. मात्र, भारताने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
कॅनडाचे आरोप तथ्यहीन असल्याचं भारताने म्हटलं आहे. भारताने आक्रमक पवित्रा घेत कॅनडियन लोकांना व्हिसा बंदी केली आहे. यापार्श्वभूमीवर शीख लोकांचा कॅनडाशी काय संबंध आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
कॅनडातील शीख लोकांची संख्या
२०२१ च्या कॅनडातील जनगणनेनुसार, कॅनडाची एकूण लोकसंख्या ३.७० कोटी इतकी आहे. यापैकी १६ लाख भारतीय वंशाचे लोक तेथे राहतात. याचा अर्थ ४ टक्के भारतीय वंशाचे लोक कॅनडाचे रहिवाशी आहेत. यातील जवळपास ७,७०,००० लोकसंख्या शीख समाजाची आहे.
विशेष म्हणजे गेल्या २० वर्षात शीख समाजाची संख्या दुप्पट झालीये. पंजाबमधील अनेक लोकांनी कॅनडामध्ये स्थलांतर केलं आहे. उच्च शिक्षण किंवा नोकरी यासाठी हे स्थलांतर झालं आहे.
शीख समाजाचा कॅनडात प्रभाव किती?
कॅनडामध्ये सर्वाधिक गतीने वाढणारा म्हणून शीख समाजाची ओळख आहे. ख्रिश्चन, मुस्लिम आणि हिंदू नंतर शीख समाज चौथा सर्वात मोठा वर्ग आहे.शीख समाज जास्त करुन ओंटारियो, ब्रिटिश कोलंबिया आणि अल्बर्टा या शहरांमध्ये एकवटलेला आहे. इंग्रजी आणि फ्रेन्चनंतर पंजाबी भाषा सर्वाधिक लोकप्रिय आहे.
शीख समाजाचे कन्स्ट्रकशन सेक्टर, ट्रान्सपोर्ट आणि बँकिग क्षेत्रामध्ये महत्त्वाचे योगदान आहे. अनेक शीख लोकांचे स्वत:चे हॉटेल्स आणि गॅस स्टेशन चेन्स आहेत. ४.१५ लाख शीख लोक कॅनडाचे कायमस्वरुपी रहिवाशी आहेत, तर १.१९ लाख शीखांकडे कायमस्वरुपी रहिवाशी प्रमाणपत्र नाही. माहितीनुसार, १९८० मध्ये फक्त ३५,००० शीख कॅनडाचे कायमस्वरुपी रहिवाशी होते.
जस्टिन ट्रुडो यांचे सरकार जेव्हा २०१५ मध्ये सत्तेत आलं तेव्हा त्यांनी शीख लोकांना मंत्रिमंडळात अधिक प्राधान्य दिलं. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात ४ शीख समाजाच्या लोकांना स्थान दिलं. फेडरल स्तरावर हे सर्वाधिक प्रतिनिधित्व होतं.
शीख लोकांचा प्रभाव कसा वाढला?
तज्ज्ञाच्या दाव्यानुसार, गुरुद्वाराच्या माध्यमातून तयार झालेल्या नेटवर्कमुळे समाजाला जोडण्यात मोठा फायदा झाला. तसेच शीख फंड म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणात निधी मिळत असतो. या निधीचा वापर निवडणूक कॅम्पेनसाठी केला जातो.
कॅनडातील एकूण ३८८ खासदारांपैकी १८ शीख आहेत. यापैकी ८ जागांवर पूर्णपणे शीख समाजाचा प्रभाव आहे. तर, १५ जागांवर शीख महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे सत्तेत असलेल्या पक्षाला शीख समाजाला दु:खवणं जड जातं. (Latest Marathi News)