श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी पुन्हा विक्रमसिंघे

सोमवार, 17 डिसेंबर 2018

हा केवळ माझा अथवा "यूएनपी'चा विजय नाही, हा श्रीलंकेच्या लोकशाहीवादी संघटना आणि आमच्या नागरिकांच्या सार्वभौमत्वाचा विजय आहे. या घटनात्मक संस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत लोकशाहीवादी संघटनांचा विजय घडवून आणणाऱ्यांचे मी आभार मानतो.  - रानिल विक्रमसिंघे, पंतप्रधान 

कोलंबो, ता. 16 (वृत्तसंस्था) : "युनायटेड नॅशनल पार्टी'चे (यूएनपी) सर्वेसर्वा रानिल विक्रमसिंघे यांनी आज पुन्हा एकदा श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनीच त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विक्रमसिंघे यांच्या शपथविधीमुळे श्रीलंकेत मागील 51 दिवसांपासून सुरू असलेला राजकीय संघर्ष संपुष्टात आला आहे. सिरीसेना यांनीच विक्रमसिंघे यांची 26 ऑक्‍टोबर रोजी हकालपट्टी केल्यानंतर श्रीलंकेमध्ये घटनात्मक पेच निर्माण झाला होता. विशेष म्हणजे अध्यक्षांच्या आदेशानंतरदेखील विक्रमसिंघे यांनी पदावरून पायउतार होण्यास नकार दिला होता. 

अध्यक्षांच्या कृपेने पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या महिंदा राजपक्षे यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राजीनामा द्यावा लागला होता. विक्रमसिंघे यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या (ता. 17) होणार आहे, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये 30 सदस्यांचा समावेश असेल, यामध्ये श्रीलंका फ्रीडम पक्षाच्या सहा सदस्यांचा समावेश राहील. आता विक्रमसिंघे यांच्या पक्षानेदेखील नमती भूमिका घेत आम्ही अध्यक्ष सिरीसेना यांच्यासोबत काम करायला तयार आहोत, असे म्हटले आहे. काही लोकांनी सिरीसेना यांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली होती, असा दावाही विक्रमसिंघे यांच्या गटाकडून करण्यात आला आहे. 

सत्याचा विजय 

"यूएनपी'चे उपाध्यक्ष साजीथ प्रेमदासा म्हणाले, की अध्यक्ष सिरीसेना यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्हाला मुळीच आश्‍चर्य वाटत नाही, यावरून आमच्या अध्यक्षांचे खरे चारित्र्य दिसून येते. सरकारमध्ये ऐक्‍य नको असणाऱ्या मंडळींनीच अध्यक्षांचे कान भरण्याचे काम केले होते, यामुळे विक्रमसिंघे यांची हकालपट्टी करण्यात आली होती; पण शेवटी विजय सत्याचाच झाला.