Twitter : तुर्की सरकारसमोर झुकलं ट्विटर; विकिपीडियाच्या संस्थापकांनी मस्कला सुनावले खडे बोल | Wikipedia Founder Jimmy Wales digs at Elon Musk over twitter censorship in Turkey | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elon Musk Jimmy Wales

Twitter : तुर्की सरकारसमोर झुकलं ट्विटर; विकिपीडियाच्या संस्थापकांनी मस्कला सुनावले खडे बोल

ट्विटर ताब्यात घेतल्यापासून इलॉन मस्क कायम वादात राहिले आहेत. ट्विटरवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचा आरोप जगभरातून केला जातो आहे. यातच आता आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. तुर्की देशातील सरकारवर टीका करणाऱ्या एका व्यक्तीचे ट्विट काढून टाकल्यामुळे मस्क यांच्यावर टीका होत आहे. विकिपीडियाचे संस्थापक जिमी वेल्स यांनीही मस्कला खडे बोल सुनावले आहेत.

काय आहे प्रकरण?

तुर्की देशाचे राष्ट्रपती रजब तैयब अर्दोआन यांनी मस्क यांना एका टीकाकाराचे ट्विट्स डिलीट करण्याची विनंती केली होती. मस्क यांनी ही विनंती मान्य करत, टीका करणाऱ्या व्यक्तीचे ट्विट हटवले. यानंतर ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचे म्हणत कित्येकांनी मस्क यांच्यावर टीकेची झोड (Elon Musk Trolled) उठवली आहे.

मस्क देतायत सरकारची साथ

मस्कवर टीका करणाऱ्या व्यक्तींमध्ये ब्लूमबर्गचे स्तंभलेखक मॅथ्यू इग्लेशिअस यांचाही समावेश आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले, की "तुर्की देशात ठीक निवडणुकीपूर्वीच सरकार आपल्या विरोधकांचा आवाज दाबत आहे, आणि मस्कही (Musk supporting Turkey government) त्यांची साथ देत आहेत. यावर 'ट्विटर फाईल्स' नावाची एक स्टोरी तयार होऊ शकते."

ब्लूमबर्गच्या पत्रकाराला म्हटले बिनडोक

इग्लेशियस यांना प्रत्युत्तर देताना इलॉन मस्क यांनी त्यांना बिनडोक म्हटले. "इग्लेशिअस तुमचा मेंदू डोक्यातून खाली पडला आहे का? संपूर्ण ट्विटर बॅन होणे, किंवा काही ठराविक ट्विट्स हटवले जाणे यापैकी तुम्हाला काय हवं आहे?" अशा आशयाचे ट्विट करत मस्क यांनी आपल्या निर्णयाचे समर्थनही केले.

जिमी वेल्स भडकले

या सर्व प्रकरणात विकिपीडियाचे संस्थापक जिमी वेल्स जाम भडकले आहेत. तुर्की सरकारने देशात दोन वर्षांपर्यंत विकिपीडियावर बंदी घातली होती. मात्र, विकिपीडियाने देशातील सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण नेले होते. त्यानंतर झालेल्या सुनावणीत विकिपीडियाच्या बाजूने निकाल लागला होता. याचाच दाखला देत वेल्स यांनी मस्कला खडे बोल (Wikipedia Founder digs at Elon Musk) सुनावले आहेत.

"आम्ही आमच्या तत्त्वांसाठी देशाच्या सर्वोच्च न्यायालयात लढा दिला आणि जिंकलो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची केवळ टिमकी न वाजवता, खऱ्या अर्थाने ते अंमलात आणणे याला म्हणतात." अशा शब्दांमध्ये वेल्स यांनी मस्कच्या ट्विटला रिप्लाय दिला.

एकूणच या सर्व प्रकारामुळे मस्क यांच्यावर जगभरातून टीकेची झोड उठली आहे. यापूर्वीही ट्विटरवरील व्हेरिफाईड अकाऊंटसाठी सबस्क्रिप्शन लागू करण्याच्या निर्णयामुळे मस्क यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं.