किव्ह : युक्रेनमधील संघर्ष थांबविण्यासाठी रशियाबरोबर तडजोड करण्यास तयार असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी आज जाहीर केले. तातडीने शस्त्रसंधी, रशियातून सैन्य माघारी आणि युक्रेनच्या सुरक्षेची हमी या बदल्यात युक्रेन नाटोचे सदस्यत्व न घेण्याचे आम्ही मान्य करू, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. (Volodymyr Zelenskyy)
युक्रेन युद्धात रशियाची आगेकूच थांबली असली तरी त्यांच्या अविरत बाँबवर्षावामुळे युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली असून शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाश्चिमात्यांकडून मदत साहित्य मिळत असले तरी युक्रेनला हव्या असलेल्या प्रमाणात शस्त्रांचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे युक्रेन सरकार हैराण झाले आहे. या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांनी एका मुलाखतीमध्ये तडजोडीस तयार असल्याचे सांगितले. ‘ही तडजोड सर्वांसाठीच फायद्याची आहे. ‘नाटो’च्या संदर्भात युक्रेनचे काय करायचे, असा प्रश्न पाश्चिमात्यांना पडला आहे; आम्हाला सुरक्षेची हमी हवी आहे; रशियाला नाटोचा विस्तार नको आहे. त्यामुळे, युक्रेनमधून सैन्य माघारी घेऊन रशियाने आम्हाला सुरक्षेची हमी दिल्यास आम्ही ‘नाटो’च्या सदस्यत्वाचा आग्रह सोडून देऊ,’ असे झेलेन्स्की यांनी मुलाखतीदरम्यान जाहीर केले. रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांच्याशी थेट चर्चा करण्याच्या आवाहनाचाही झेलेन्स्की यांनी पुनरुच्चार केला. पुतीन यांच्याबरोबर चर्चा केल्याशिवाय रशियाला युद्ध थांबवायचे आहे की नाही, हे समजणारच नाही, असे झेलेन्स्की म्हणाले. (Volodymyr Zelenskyy)
आंदोलकांचे कौतुक
खेरसन शहरात रशियन सैनिकांसमोर आंदोलन करणाऱ्या नागरिकांचे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी कौतुक केले. या युद्धाने सामान्य नागरिकांनाही शूरवीर बनविले आहे आणि शत्रूला हा विरोध अनाकलनीय आहे, असे झेलेन्स्की म्हणाले.
या तडजोडींना युक्रेन तयार
- नाटोचे सदस्यत्वाची मागणी सोडून देणार
- रशियाच्या ताब्यातील क्रिमियाच्या दर्जाबाबत तडजोड करणार
- युक्रेनच्या पूर्व भागात बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या दोन्बास भागाच्या दर्जाबाबतही चर्चा करणार
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.