भारताने भ्रमात राहू नये; डोकलाममध्ये सैन्य वाढवू: नवी चिनी धमकी

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जुलै 2017

चिनी सार्वभौमत्व व चिनी भूमीचे कोणतेही मूल्य देऊन संरक्षण करण्याच्या पीएलएच्या निर्धारास गेल्या 90 वर्षांचा इतिहास साक्षी आहे. आमची क्षमता व मनोबल अभंग आहे

बीजिंग - डोकलाम येथे भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य समोरासमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) या चिनी सैन्याकडून भारतास आज (सोमवार) इशारा देण्यात आला.

"पीएलएकडून चीनच्या सार्वभौमत्वाचे कोणत्याही किंमतीत संरक्षण करण्यात येईल,' असा गर्भित इशारा देत पीएलएकडून भारताने या भागामधून लष्कर मागे घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. भारताच्या "भूमिके'च्या पार्श्‍वभूमीवर या भागात सैन्य आणखी वाढविण्यात येईल, अशी थेट धमकीही पीएलएकडून देण्यात आली आहे. पीएलएच्या 90 व्या वर्धापन दिनाच्या (1 ऑगस्ट) पार्श्‍वभूमीवर भारताने कोणत्याही भ्रमात राहू नये, असा अत्यंत कडक इशारा चिनी सैन्याकडून देण्यात आला आहे.

"चिनी सार्वभौमत्व व चिनी भूमीचे कोणतेही मूल्य देऊन संरक्षण करण्याच्या पीएलएच्या निर्धारास गेल्या 90 वर्षांचा इतिहास साक्षी आहे. आमची क्षमता व मनोबल अभंग आहे,'' असे चीनच्या संरक्षण मंत्रालयामधील प्रवक्ते कर्नल वु किआन यांनी म्हटले आहे. डोकलाम भागात रस्ता बांधण्याच्या निर्णयाचेही यावेळी चीनकडून समर्थन करण्यात आले.

"जून महिन्यामध्ये चिनी देशाचा भाग असलेल्या डोकलाम भागात चिनी सैन्याकडून रस्ता बांधण्यात येत होता. चीनचाच भाग असलेल्या प्रदेशात चिनी सैन्याकडून रस्ता बांधणे, हा आमचा सार्वभौम अधिकार आहे. यामुळेच भारताने आपली चूक सुधारुन या भागातून लष्कर मागे घ्यावे, अशी आमची मागणी आहे,'' असे किआन म्हणाले.

भारताने सैन्य माघारीस स्पष्ट नकार दिल्यामुळे चीनकडून तिबेट भागात सैन्याची आक्रमक हालचाल करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी "भारत स्वत:च्या हिताचे संरक्षण करण्यास सक्षम' असल्याचे राज्यसभेत सांगितले आहे. 

डोकलाममध्ये लष्करांच्या हालचालींवरून निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनने कोणत्याही वादाशिवाय थेट चर्चा करण्याचे आवाहन अमेरिकेकडूनही करण्यात आले आहे.  

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांचा बीजिंग दौरा डोकलामवरून भारत आणि चीन यांच्या दरम्यान निर्माण झालेला तणाव कमी होण्यास महत्त्वाचा ठरू शकतो, असे मत एका चिनी विश्‍लेषकाने नोंदविले. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्‍स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीसाठी दोवाल 27 आणि 28 जुलैला चीनचा दौरा करणार आहेत.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will safeguard China's sovereignty at any cost, PLA threatens India