पर्यावरणावरील चर्चेसाठी जग एकवटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Climate Change Conference

पर्यावरणावरील चर्चेसाठी जग एकवटले

शर्म एल-शेख : युक्रेन युद्ध, महागाईवाढ, अन्नधान्यची टंचाई आणि ऊर्जेची कमतरता अशा अनेक समस्या भेडसावत असताना हवामान बदल या जगासमोरील सर्वांत मोठ्या संकटाबाबत चर्चा करण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी जगातील बहुतेक देशांचे प्रतिनिधी इजिप्तमधील शर्म एल-शेख शहरात जमले आहेत. हवामान बदल परिषदेला (सीओपी-२७) सोमवारपासून येथे सुरुवात होणार आहे.

जागतिक तापमानात सातत्याने वाढ होत असून सर्व जगाने एकत्रितपणे प्रयत्न करून ही वाढ नियंत्रणात न आणल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी गेल्याच आठवड्यात दिला होता.

हवामान बदलाच्या परिणामांपासून बचाव करण्यासाठी गरीब देशांनाही मदत करण्याचे आवाहन गुटेरेस यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर हवामान बदल परिषद सुरु होणार आहे. या परिषदेचे उद्‌घाटन झाल्यानंतर विविध देशांचे प्रतिनिधी आपापली भूमिका मांडणार आहेत. १८ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत होणाऱ्या विविध सत्रांमध्ये ४० हजार जण उपस्थित राहणार आहेत.

तापमान वाढीबाबत जगभरात गांभीर्याने चर्चा सुरु झाली असतानाच सर्वप्रथम कोरोनाची लाट आणि नंतर युक्रेन युद्ध यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले होते. यंदाच्या परिषदेवरही युक्रेन युद्धाचा प्रभाव असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पर्यावरणवाद्यांची इजिप्तवर टीका

हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याबाबत कोणताही देश ठोस उपाययोजना करत नसल्याबद्दल पर्यावरणप्रेमी संघटनांनी परिषदेच्या ठिकाणी निदर्शने सुरु केली आहेत. मात्र, इजिप्त सरकार त्यावर बंधने आणत असल्याबद्दल आणि निदर्शकांवर पाळत ठेवत असल्याबद्दल या संघटनांनी टीका केली आहे.

सरकारने अनेक निदर्शकांना अटकही केली असल्याचा दावा ‘ह्युमन राइट्‌स वॉच’ या संघटनेने केला आहे. सध्या तुरुंगात असलेले इजिप्तमधील लोकशाहीवादी कार्यकर्ते आला अब्देल फताह यांनी परिषदेच्या पहिल्या दिवसापासूनच उपोषण सुरु केले आहे.

मोदी, जिनपिंग जाणार नाहीत

हवामान बदल परिषदेला १२० देशांचे प्रमुख हजर राहणार असल्याचे इजिप्त सरकारने सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे या परिषदेत भूमिका मांडणार आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग या दोघांचेही इजिप्तला जाण्याचे नियोजन नाही.

या दोन महत्त्वाच्या नेत्यांच्या अनुपस्थितीत होणाऱ्या या परिषदेत हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याबाबत ठोस निर्णय अथवा करार होण्याची शक्यता कमी असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.