जगाचे स्वास्थ्य सांभाळणारी "डब्ल्यूएचओ' सत्तरीत

वृत्तसंस्था
रविवार, 8 एप्रिल 2018

सात दशकांपासून आरोग्याच्या संवर्धनाचे कार्य; जागतिक दिनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू

सात दशकांपासून आरोग्याच्या संवर्धनाचे कार्य; जागतिक दिनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू

जीनिव्हा: जगाभरातील आरोग्यविषयक घटकांकडे लक्ष पुरविणारी "जागतिक आरोग्य संघटना' (डब्ल्यूएचओ- वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) आता सत्तरीत पोचली आहे. जागतिक स्तरावर स्वास्थ्य आणि आरोग्याचे संवर्धन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे 1948 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली. देवी या रोगाचे जगातून उच्चाटन व्हावे व जग तंबाखूमुक्त व्हावे, यासाठी "डब्ल्यूएचओ'ने गेल्या सात दशकांपासून लढा दिला आहे. "उच्च दर्जाचा आरोग्याचा आनंद घेणे हा प्रत्येक मनुष्याचा (जात-धर्म, राजकीय विचार, आर्थिक व सामाजिक स्तर यात मतभेद न करता) मूलभूत हक्क आहे,' हे या संघटनेचे एक तत्त्व आहे. यंदाचे वर्ष या तत्त्वालाच समर्पित केले आहे.

यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना "जागतिक आरोग्याची हमी ः सर्वांसाठी, सर्व ठिकाणी,' अशी असून, ही संकल्पना राबविण्यासाठी "डब्ल्यूएचओ' च्या जगभरातील कार्यालयांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. संघटनेचे सरसंचालक डॉ. टेडरोस अधानोम घेब्रेयेसुस हेही यात सहभागी झाले. ""चांगेले आरोग्य किंवा निरोगी शरीर हे अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा अमूल्य गोष्ट आहे. जेव्हा लोक निरोगी असतात तेव्हा ते शिकू शकतात, काम करू शकतात; तसेच स्वतःचे व त्यांच्या कुटुंबाचे मनोधैर्य वाढवतात. पण, ते आजारी पडल्यास कुटुंब व समाजावर त्याचा परिणाम होतो. म्हणूनच सर्वांसाठी चांगले आरोग्य देण्यास जागतिक आरोग्य संघटना कटिबद्ध आहे,'' असे डॉ. टेडरॉस यांनी सांगितले.

"डब्ल्यूएचओ'चे यश
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाल्यापासून आयुष्यमान 25 वर्षांनी वाढ झाली आहे. "डब्ल्यूएचओ'च्या अथक प्रयत्नांमुळे 2016 मध्ये पाच वर्षे वयोगटातील मुलांचा मृत्यू होण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. हे संघटनेचे मोठे यश मानले जाते. 1990मध्ये वयाला पाच वर्षे होण्यापूर्वी 60 लाख मुलांचा मृत्यू होत झाला होता. देवी रोगाचे जगातून निर्मूलन झाले असून, पोलिओ उच्चाटनाच्या मार्गावर आहे. अनेक देशांमध्ये गोवर, मलेरिया व उष्णकटिबंधीय रोग (उदा. नारू, हत्तीरोग), तसेच मातेकडून मुलांकडे संक्रमित होणारे "एचआयव्ही' व गुप्तरोगाचे निर्मूलन झाले आहे.

अशी आहे संघटना...

जीनिव्हा
मुख्य कार्यालय

194
सदस्य देश

6
जगभरातील विभाग

150
एकूण कार्यालये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Health Organization "WHO"