
‘ला निना’चा प्रभाव आणखी ६ महिने
जीनिव्हा : मॉन्सूनच्या निर्मितीला कारणीभूत ठरणाऱ्या ‘ला निना’ या सागरी प्रवाहाचा परिणाम आणखी सहा महिने राहण्याचा अंदाज जागतिक हवामान संस्थेने (डब्लूएमओ) व्यक्त केला आहे. तसेच, या प्रवाहाचा वातावरणावरील परिणाम सलग तीन वर्षे टिकून राहिला (ट्रिपल डिप) असून या शतकातील ही पहिलीच घटना आहे. जगभरात विविध ठिकाणी असणारी तीव्र दुष्काळ किंवा प्रचंड पावसाची स्थिती हा या हवामान बदलाचाच परिणाम असल्याचे ‘डब्लूएमओ’ने म्हटले आहे.
‘ला निना’ प्रवाहाचा परिणाम म्हणून समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान कमी होते. गेल्या काही आठवड्यांमध्ये व्यापारी वाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने विषुववृत्ताजवळील प्रशांत महासागरावरील ‘ला निना’चा प्रभाव आणखी वाढला आहे. ‘ला निना’चा प्रभाव सलग तीन वर्षे टिकून राहणे ही दुर्मीळ घटना आहे. या प्रभावामुळे जागतिक तापमानवाढीचा वेग काहीसा कमी झाला आहे. मात्र, त्यामुळे ही तापमानवाढ थांबणार नाही, असे ‘डब्लूएमओ’चे सरचिटणीस पेटरी टॅलस यांनी सांगितले. ‘ला निना’च्या ‘ट्रिपल डिप’मुळे वातावरण थंड झाले असले तरी यामुळे जागतिक तापमानवाढ कमी होत आहे, असे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘ला निना’चा प्रभाव
‘ला निना’ ही प्रशांत महासागरातील नैसर्गिक घटना असून त्याचा जगभरातील वातावरणावर परिणाम होतो. ‘ला निना’चा प्रभावामुळे अटलांटिक भागात वादळे येतात, अमेरिकेत पाऊस कमी होतो आणि जंगलांमध्ये वणवे पेटतात, दक्षिण आशियात मोसमी पाऊस येतो. आफ्रिका खंड आणि दक्षिण अमेरिकेतील सध्याची तीव्र दुष्काळाची स्थिती तसेच, आशिया आणि ऑस्ट्रेलियात अतिप्रमाणात कोसळणारा पाऊस हा ‘ट्रिपल डिप’चाच परिणाम असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. आफ्रिकेतील दुष्काळ आणखी तीव्र होऊन त्याचा लाखो लोकांना फटका बसण्याचा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.