जाधव यांच्या प्रकृतीबाबत चिंता कायम

पीटीआय
शनिवार, 20 मे 2017

हे प्रकरण आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेले असल्याने जाधव यांच्याबाबतची सद्यपरिस्थिती पाकिस्तानने भारताला कळविणे आवश्‍यक आहे. जाधव यांची लष्करी न्यायालयात सुनावणी होऊनच त्यांना शिक्षा सुनावल्याचा पाकिस्तानचा दावा असला, तरी या सुनावणीची कागदपत्रेही पाकिस्तानने सादर केलेली नाहीत

नवी दिल्ली - कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या बाजूने निकाल लागला असला, तरी जाधव यांच्या प्रकृतीबाबत भारताला असलेली चिंता अद्यापही कायम आहे. जाधव यांची प्रकृती अथवा त्यांना अटकेत ठेवल्याचे ठिकाण याबाबत भारताला पाकिस्तानने अद्यापही काही माहिती दिलेली नाही.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेले असल्याने जाधव यांच्याबाबतची सद्यपरिस्थिती पाकिस्तानने भारताला कळविणे आवश्‍यक आहे. जाधव यांची लष्करी न्यायालयात सुनावणी होऊनच त्यांना शिक्षा सुनावल्याचा पाकिस्तानचा दावा असला, तरी या सुनावणीची कागदपत्रेही पाकिस्तानने सादर केलेली नाहीत. जाधव यांच्या प्रकृतीचा अहवाल देण्याची मागणी भारत सरकारने गेल्याच आठवड्यात पाकिस्तानकडे केली आहे.

कुलभूषण यांच्या आईने पाकिस्तान सरकारकडे व्हिसासाठी अर्ज केला आहे. मात्र या अर्जावर पाकिस्तानने प्रक्रिया केली अथवा नाही, याबाबतही माहिती उपलब्ध नाही. मात्र या अर्जाकडे पाकिस्तानने दुर्लक्ष केल्याची माहिती असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी सांगितले.

Web Title: Worries still persist regarding Jadhav