माघार घ्या; अन्यथा सिक्कीमच्या स्वातंत्र्यास पाठिंबा देऊ: नवी चिनी धमकी

वृत्तसंस्था
शनिवार, 8 जुलै 2017

भारताच्या प्रादेशिक वर्चस्ववादाच्या धोरणाचा अंत करण्याची गरज आहे. याचबरोबर, भारताकडून राबविल्या जात असलेल्या आडमुठ्या धोरणाबद्दल या देशास किंमत मोजावयासही लावणे आवश्‍यक आहे. यामुळे चीनने सिक्कीमसंदर्भातील धोरणाचा फेरविचार करावा

 

नवी दिल्ली - चीन व भारतामध्ये सध्या सुरु असलेल्या सीमारेषेच्या वादासंदर्भात भारताने माघार घेतली नाही; तर सिक्कीममधील स्वातंत्र्याच्या मागणीस पाठिंब देऊ, असा इशारा चीनकडून देण्यात आला आहे. सिक्कीमच्या स्वातंत्र्यास पाठिंबा देण्याचे धोरण भारताला रोखण्यात यशस्वी ठरेल, असे मत "ग्लोबल टाईम्स' या चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या मालकीच्या वृत्तपत्रामधील अग्रलेखामध्ये व्यक्त करण्यात आले आहे.

"भारताच्या प्रादेशिक वर्चस्ववादाच्या धोरणाचा अंत करण्याची गरज आहे. याचबरोबर, भारताकडून राबविल्या जात असलेल्या आडमुठ्या धोरणाबद्दल या देशास किंमत मोजावयासही लावणे आवश्‍यक आहे. यामुळे चीनने सिक्कीमसंदर्भातील धोरणाचा फेरविचार करावा,' असा कांगावा या अग्रलेखाच्या माध्यमामधून करण्यात आला आहे.

"चीनने भारताने सिक्कीम बळकाविल्याच्या घटनेस 2003 मध्ये मान्यता दिली होती. या विषयासंदर्भातील चीनचे धोरण पुन्हा आखता येईल. सिक्कीमकडे एक स्वतंत्र राज्य म्हणून अभिमानाने पाहणारे नागरिक तेथे आहेत. याचबरोबर सिक्कीमसंदर्भात जगाच्या असलेल्या दृष्टिकोनासंदर्भातही ते संवेदनशील आहेत. चिनी समाजामध्ये सिक्कीमच्या स्वातंत्र्यास पाठिंबा देणारे घटक आहेत. या दृष्टिकोनाचा प्रसार केला जाईल; आणि सिक्कीममधील स्वातंत्र्याच्या मागणीस उत्तेजन दिले जाईल,'' असे या अग्रलेखामध्ये म्हटले आहे.

"भारताने 1960 व 70 च्या दशकांत सिक्कीमचे सार्वभौमत्व निष्ठूरपणे चिरडून टाकल्याचा,' आरोप या अग्रलेखाच्या माध्यमामधून व्यक्त करण्यात आला आहे. याचबरोबर, सिक्कीम बळकाविण्याचे भारतीय धोरण हे भूतानसाठी "दु:स्वप्न' असल्याची टीकाही या लेखामध्ये करण्यात आली आहे. याचबरोबर, याच लेखामध्ये भारत भूतानला भारतीय भूमिकेस पाठिंबा देण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोपही नव्याने करण्यात आला आहे.

सिक्कीममधील डोकलाम भागात हद्दीच्या वादातून जवळपास एक महिन्यापासून दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आले आहे. भारत आणि चीनमधील हा वाद योग्यरीतीने न हाताळल्यास त्याची परिणती युद्धात होऊ शकते, असे चीनमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दोन्ही देशांमधील सैन्य 1962 नंतर सर्वप्रथमच सर्वाधिक काळ एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.

सिक्कीममधील वादग्रस्त भागामधील आपली स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने भारताने "विनायुद्ध स्थितीतील' काही सैन्य तुकड्या येथील डोका खिंडीमध्ये तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारत-चीन दरम्यान सीमेवरील "ट्राय-जंक्‍शन पॉइंट्‌स'(जेथे तीन देशांच्या हद्दी मिळतात) निश्‍चित करण्याच्या संदर्भात उभय देशांत 2012 मध्ये झालेला करार आधारभूत मानण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार असे तिहेरी सीमा बिंदू निश्‍चित करताना संबंधित तिसऱ्या देशाबरोबर सल्लामसलतीची तरतूद आहे. त्यामुळे असा एखादा तिहेरी सीमा बिंदू निश्‍चित करण्याचा कोणताही एकतर्फी प्रयत्न हा या कराराचा भंग असल्याचे स्पष्ट करून भारताने चीनचा पर्दाफाश केला आहे. तसेच या परिसरात "जैसे थे' स्थिती राखण्याचे आवाहन केले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
भारतीय लष्करातील जवान दहशतवाद्यांना सामील?
ठाण्यात गर्दीच्या ठिकाणी रिक्षाचालकाकडून तरुणीची छेडछाड​
काश्मीरमध्ये घुसखोरीत घट; 92 दहशतवाद्यांचा खात्मा​
गणेशोत्सव, दहीहंडीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक​
पावसाळी अधिवेशनापूर्वी दुपारी शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक
भुजबळांची मालमत्ता जप्त​
मुख्यमंत्र्यांची निवड जनतेतून का नाही? - उद्धव ठाकरे​
भाजपचे मोदी-मोदी, तर शिवसेनेचे 'चोर-चोर'​
इस्राईलशी मैत्रीची कसदार 'भूमी'

 

Web Title: Would support Sikkim's Freedom, warns China