मधुमेह टाळता येईल का?

डॉ. रमेश गोडबोले
Wednesday, 13 November 2019

मधुमेहाला ‘सायलेंट किलर’ असे म्हटले जाते. तो पूर्णपणे टाळता आला नाही, तरी लांबवता येईल आणि मधुमेहामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक व्याधींची तीव्रता कमी करता येईल. त्यासाठी मधुमेहाबद्दल जनजागृती करणे आवश्‍यक आहे. आजच्या जागतिक मधुमेह दिनानिमित्त.

मधुमेहाला ‘सायलेंट किलर’ असे म्हटले जाते. तो पूर्णपणे टाळता आला नाही, तरी लांबवता येईल आणि मधुमेहामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक व्याधींची तीव्रता कमी करता येईल. त्यासाठी मधुमेहाबद्दल जनजागृती करणे आवश्‍यक आहे. आजच्या जागतिक मधुमेह दिनानिमित्त.

भारत हा २०२५ पर्यंत मधुमेहींची संख्या सर्वाधिक असणारा देश असेल असे भाकीत जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. याचे मुख्य कारण गेल्या ४०-५० वर्षांत भारतीयांची झपाट्याने बदललेली जीवनपद्धती! मधुमेहाला आळा घालण्यासाठी काही प्रमाणात आपण प्रयत्न करू शकतो. ही व्याधी श्रीमंत, उच्चभ्रू शहरी लोकांमध्येच आढळते असा पूर्वी समज होता. परंतु सध्याच्या पाहणीनुसार ग्रामीण, कष्टकरी, एवढेच नव्हे तर आदिवासींमध्येही मधुमेहाचे प्रमाण कमी नाही, असे आढळले आहे. त्यामुळे मधुमेह ही समस्या सर्वव्यापी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. या व्याधीबद्दल काळजीची गोष्ट म्हणजे तो तरुणांमध्येही भरपूर प्रमाणात वाढत आहे. 
मधुमेह होण्याची कारणे अशी

१. अनुवांशिकता - मधुमेहाच्या कारणांपैकी अनुवांशिकता हे प्रमुख कारण समजले जाते. बाल्यावस्थेत होणाऱ्या मधुमेहाच्या प्रकारात अनुवांशिकतेला फारसे स्थान नाही, परंतु प्रौढावस्थेत होणाऱ्या मधुमेहाचा अनुवांशिकतेशी संबंध आढळतो. अनुवांशिकता शोधण्याच्या सोप्या व स्वस्त तपासण्या विकसित झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रत्येक प्रौढ व्यक्तीने वयाच्या तिशीनंतर ७५ ग्रॅम साखरेचे सरबत पिऊन दोन तासांनी रक्तातील साखर दरवर्षी तपासून मधुमेह नसल्याची खात्री करावी. नक्की आकडेवारी सांगता येत नसली, तरी आई-वडिलांपैकी एकास मधुमेह असल्यास मुलाला मधुमेह होण्याची शक्‍यता ५० टक्के, तर दोघांनाही मधुमेह असल्यास ७५ टक्के असते. मागील पिढीत चाळिसाव्या वर्षी मधुमेहाची सुरुवात झाल्यास पुढील पिढीत तिसाव्या वर्षीही मधुमेह होण्याची शक्‍यता असते.  

२. जन्मतः कमी वजन - जी बाळे कमी वजनाची जन्मतात, त्यांना योग्य वजनाच्या बाळांच्या तुलनेने पुढील आयुष्यात मधुमेह, हृदयविकार इ. रोग जास्त प्रमाणात होतात, असे आढळले आहे. तसेच कुपोषित मातांच्या गर्भामध्येही मधुमेहाची बीजे असतात.

३. स्थूलता - अनुवांशिकता हे मधुमेहाचे एक प्रमुख कारण असले, तरी त्याला स्थूलतेसारखे पोषक वातावरण नसेल तर तो बराच काळ सुप्तावस्थेत राहू शकतो. प्रौढ वयातील मधुमेहामध्ये स्थूलतेशी जवळचा संबंध आढळतो.

४. आहार - श्रीमंतांमध्ये जरुरीपेक्षा जास्त उष्मांक (कॅलरी) देणाऱ्या आहारातून स्थूलता येते व त्यामुळे मधुमेहाचा संभव वाढतो, तर गरीब, कृष व्यक्तींमध्ये कुपोषणामुळे, विशेषतः वाढत्या वयात, प्रथिनांचा अपुरा पुरवठा झाल्याने मधुमेह होतो. गोड खाल्ल्यामुळे मधुमेह होतो, असा गैरसमज असतो. मधुमेहाच्या भीतीपोटी काही जण चहातील साखरही बंद करतात. त्याची जरुरी नसते. मात्र ज्यांच्या घराण्यात मधुमेह आहे अशांनी गोड खाण्याचा अतिरेक केला, तर स्वादुपिंडावर ताण पडून ते लवकर थकते. त्यामुळे अतिगोड खाणे टाळावे.

५. ताणतणाव - प्रदीर्घ ताणतणावामुळे शरीरातील अंतःस्त्रावी पदार्थांचा (हार्मोन्स) समतोल बिघडतो. त्यामुळे सुप्तावस्थेतील मधुमेह जागृत होतो. कौटुंबिक काळज्या, घरातील मोठी आजारपणे, अवास्तव महत्त्वाकांक्षा अशा कारणांनी ताणतणाव वाढतो. ताणतणावावर मात केल्यास मधुमेह परत सुप्तावस्थेत जाऊ शकतो.

६) जीवनशैली - स्थूलता, खाण्याच्या सवयी, मनःशांती, श्रमाची सवय यांसारख्या गोष्टींवर आपले काही प्रमाणात नियंत्रण राहू शकते. या सर्वांचा परिणाम होऊन जीवन जगण्याची एक शैली निर्माण होते. मधुमेहाला दूर ठेवण्यासाठी त्याला महत्त्व आहे. आजकाल लोकांना पोळी, भाकरी, भात-भाजी असा साधा आहार आवडेनासा झाला आहे. पाव-भाजी, भजी-वडे, फरसाण, आइस्क्रीम, चीज-लोणी, शीतपेये, हॉटेलातील पदार्थ यांचे आहारातील प्रमाण वाढले आहे. या सवयी लहानपणापासून लागल्यास जादा कॅलरी पोटात जातात. तरुणपणी शारीरिक हालचाली जास्त असल्याने सहसा वजन वाढत नाही. परंतु, प्रौढावस्थेत स्थैर्य आल्यावर श्रम कमी होतात. त्यामुळे स्थूलता येते. त्याच्या पाठोपाठ मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार या व्याधीही मागे लागतात.

या विवचेनावरून लक्षात येईल, की मधुमेह पूर्ण टाळता आला नाही, तरी तो लांबवता येईल आणि मधुमेहामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक व्याधींची तीव्रता कमी करता येईल. यासाठी मधुमेहाबद्दल प्रबोधन करणे आवश्‍यक आहे. परंतु मधुमेहाबद्दल आरोग्य खात्यातर्फे राबवला जाणारा कोणताही ठोस कार्यक्रम नाही. यासाठी आरोग्य खात्याने मधुमेहासाठी निराळी तरतूद करणे आवश्‍यक आहे. तसे केले नाही तर जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवलेले भाकीत खरे ठरण्याची शक्‍यता आहे. सरकारने काही करण्याची वाट न पाहता वैयक्तिक व कौटुंबिक पातळीवर मधुमेह टाळण्यासाठी सर्वांनीच गांभीर्याने प्रयत्न केले पाहिजेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article dr ramesh godbole on diabetes