गरीब रुग्णांना उपचाराचा मार्ग मोकळा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

शहरातील रुग्णालयांनी गरीब रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिल्यानंतर अखेर रुग्णालयांची देणी फेडण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. शहरी गरीब योजनेतील रुग्णालयांना 15 कोटी रुपये तातडीने देण्यात येणार असून, त्यामुळे रुग्णांना उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास आणखी दहा दिवसांचा अवधी असल्याने तत्पूर्वी उपचार न थांबविण्याची सूचना महापालिकेने रुग्णालयांना केली आहे. 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी राबविण्यात येणाऱ्या शहरी गरीब योजनेत दरवर्षी 12 हजार कुटुंबाना आरोग्य सेवा देण्यात येते. त्यासाठी विविध खासगी 71 रुग्णालयांशी करार केला असून, या योजनेसाठी वर्षाला 25 कोटी रुपयांची तरतूद केली जाते. परंतु, रुग्ण संख्या आणि उपचार खर्चाची मर्यादा वाढविल्याने ही तरतूद अपुरी ठरत आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून गरीब रुग्णांना दाखल करून घेतलेल्या रुग्णालयांना त्यांची बिले मिळाली नव्हती. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून रुग्णांवर उपचार करण्यास नकार देत रुग्णालयांनी बिलांसाठी महापालिकेकडे तगादा लावला होता. 

या पार्श्‍वभूमीवर रुग्णालयांना बिले देण्याची मागणी सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या बैठकांत नगरसेवकांनी केली होती. या योजनेसाठी वर्गीकरणाद्वारे निधी देण्याचा निर्णय झाला होता. मात्र त्यावर कार्यवाही झाली नव्हती. त्यानुसार आता 15 कोटी रुपये वर्गीकरणाद्वारे देण्याची प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे. तो पुढील आठवड्यात मंजूर होईल, असे सांगण्यात आले. 

वर्गीकरणाद्वारे अखेर निधी देणार 
शहरातील हजारो गरीब रुग्णांशी संबंधित योजनेसाठी निधीची गरज असूनही महापालिकेला तो वेळेत देता आला नव्हता. आता यासाठी कोथरुडमधील नियोजित शिवसृष्टीचे 10 कोटी आणि बालगंधर्व रंगमंदिर पुनर्उभारणीच्या कामातून 5 कोटी असे 15 कोटी रुपये वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या वेगाने अंमलबजावणी करीत असल्याचा दावा महापालिका करीत असतानाच त्यातील निधीचे वर्गीकरण केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pmc will pay pending bills of hospiltals