हेल्दी फूड : व्यायाम आणि पौष्टिक आहार

हेल्दी फूड : व्यायाम आणि पौष्टिक आहार

आजच्या माहितीच्या विस्फोट झालेल्या युगात कुठल्या प्रकारचा डाएट पाळायचा आणि कुठला नाही याबद्दलची वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला मिळत असते. यामध्ये साधारणपणे कोणती कर्बोदके खाऊ नयेत; कोणती फळे खावीत अशा स्वरूपाची माहिती असते. तथापि, शरीरातील उष्मांक कसे वाढवावेत आणि कसे कमी करावेत हेच या माहितीचे सार असते. तुम्ही फक्त पौष्टिक अन्न खात असाल, मात्र तुम्ही व्यायाम करत नसाल आणि तुमच्या शरीरावर तुमचे नियंत्रण नसल्यास तुम्ही वजन कमी करू शकणार नाही. व्यायाम आणि पौष्टिक आहार यांचा परस्परसंबंध कसा आहे, ते आपण पाहूया...

शरीरामधील चयापचयाच्या सर्व गोष्टी शरीरात वापरली जाणारी ऊर्जा आणि तिचे होणारे रूपांतरण यावरच अवलंबून असतात. त्यामुळे चयापचयाची क्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने व्यायामाचा उपयोग होऊ शकतो. जर्मनीमध्ये एका शास्त्रज्ञाने असाच एक प्रयोग करून पाहिला; त्याने दररोज फक्त एक ओरिओ खायचे ठरवले, साधारण महिनाभरानंतर त्याने वजन पाहिले असता त्याचे वजन ६ किलोने वाढले होते. व्यायामाशिवाय अल्पाहाराचा उपयोग होऊ शकणार नाही.

आपल्याकडे शारीरिक शिक्षणाला शालेय शिक्षणापासूनच महत्त्व दिलेले आहे. मात्र, दुर्दैवाने तरुण वयात शारीरिक शिक्षणाकडे कुणी तितकेसे लक्ष देत नाही. खरेतर तरुण वयात शरीराची चयापचय शक्ती चांगली असल्याने त्याकडे लक्ष द्यावे असंही वाटत नाही. त्‍या वयात आपण एक पॅकेट चिप्स खाल्ले तरी शरीरावर त्याचा फारसा परिणाम होत नाही, परंतु जसजसे आपले वय वाढते तसे यामध्ये बदल होत जातात. 

वयोपरत्वे शरीराची चयापचय शक्ती कमी होत जाते. ही खरेतर आपल्या शरीराच्या दृष्टीने वाईट गोष्ट आहे, पण याहीपेक्षा वाईट गोष्ट ही आहे की, दिवसेंदिवस आपले खाणे वाढते आणि आपली हालचाल मंदावते. व्यायाम आणि खानपान या एकमेकांना परस्परपूरक गोष्टी आहेत. तुम्ही ठराविक प्रकारचे आहार घेऊन डाएट पाळत असाल, परंतु तुमची त्याप्रमाणात हालचाल नसल्यास तुमचे घटलेले वजन पुन्हा वाढू शकते. शरीराची हालचाल तुमची चयापचयाची शक्ती वाढवते. 

तुम्हाला आनंददायी वाटणारा कुठल्याही प्रकारचा व्यायाम करणे जसे, वजन उचलणे, धावणे, पोहणे किंवा एखादा खेळ खेळणे तुमच्या शरीरासाठी गरजेचे आहे. परंतु यामध्ये सातत्य ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कुठल्याही प्रकारची हालचाल आपले आरोग्य, शरीराची रोगप्रतिकारक क्षमता लवचिकता आणि सहनशक्ती वाढविण्यास मदत करते. 

ज्याप्रमाणे बरेचदा आपल्याला लाँग वॉक घ्यायला आणि आपल्या आवडत्या ठिकाणी फिरायला जायला आवडते त्याचप्रमाणे व्यायामानंतर योग्य प्रमाणात प्रथिने आणि कर्बोदकांनी युक्त असा आहार घेण्याची सवय लावून घेणे उतारवयात शरीराची शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अशाप्रकारे व्यायाम आणि त्याच्या जोडीला रुचकर पण पौष्टिक आहार घेणे शरीरासाठी दीर्घकालीन फायद्याचे आहे.

(लेखिका ‘किलोबीटर’ या हेल्थ फूडविषयक स्टार्टअपच्या संस्थापिका आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com