Video : माझा फिटनेस : व्यायामाचे रौप्यमहोत्सवी वर्ष

Ramesh-Pardeshi
Ramesh-Pardeshi

व्यायाम माझ्या अंगवळणीच पडला आहे. मी २५ वर्षांपासून नियमितपणे व्यायाम करत आहे. शिक्षण घेत असताना मी राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होतो. कबड्डी व सॉफ्टबॉल माझे आवडते खेळ. त्यामुळे १९९४ पासून सकाळी साडेसहा ते साडेनऊ व सायंकाळी चार ते सहाच्या दरम्यान आम्ही ग्राउंडवरच असायचो. त्यानंतर रात्री आठ ते अकराच्या दरम्यान नाटकांच्या तालमी करत होतो. मात्र, २००५नंतर चित्रीकरणामुळे रात्री उशीर होत असल्याने नाईलाजास्तव सकाळच्या व्यायामात खंड पडायचा. चित्रपटासंबंधी बैठक असल्यास मी घरापासून कार्यालयापर्यंत धावत जायचो. त्यातूनही व्यायाम होत होता. माझे चुलते बॉडी बिल्डर होते. त्यांनी घरामध्ये एक नियमच केला होता. जो व्यायामाला सुटी देईन, त्याने जेवणाचे नाही. त्यामुळे जेवण न मिळण्याच्या भीतीपोटी का होईना, मी व्यायामात कधीच खाडा करत नव्हतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अभिनय क्षेत्रामध्ये आल्यानंतर व्यायामामध्ये बदल झाला, कारण खेळाडू अन् अभिनेत्याचा फिटनेस वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्यानुसार माझ्या शरिरयष्टीमध्ये बदल करावा लागला. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटासाठी मी दीडवर्ष दररोज सलग साडेतीन किलोमीटर धावण्याची सवय लावून घेतली. त्यानंतर २१ किलोमीटरच्या तीन मॅरेथॉनमध्येही सहभागी झालो. सध्या एक दिवस टेकडीवर, एक दिवस जिममध्ये तर एक दिवस वेट ट्रेनिंग अशा प्रकारचा व्यायाम करतो. रविवारी शरीराला विश्रांतीसाठी सुटी घेतो. आहारामध्ये मांसाहार घेतो. त्यामध्ये चिकन, मटण, अंडी याबरोबरच विविध प्रकारच्या भाज्या व ज्वारीची भाकरी खातो. ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मला तब्बल आठ किलो वजन वाढवावे लागले. त्यासाठी ही मेहनतच कामी आली. 

महेश हगवणे व दिग्दर्शक, निर्माते प्रवीण तरडे हे माझे फिटनेसचे गुरू आहेत. खरंतर दोघेही माझे अतिशय जवळचे मित्रही आहेत. प्रवीणला पिळदार शरीरयष्टीची नैसर्गिक देणगीच मिळाली आहे. महेशही माझ्याकडून सर्व प्रकारचे व्यायाम करून घेतो. हाच व्यायाम कोरोनाच्या संकटकाळात रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी कामी आला. आजच्या तरुणांनीही वेळेच कारण न देता व्यायाम केला पाहिजे, कारण तो आपण कोणत्याही वेळी करू शकतो. मी वेळ न मिळाल्यास रात्री, ऊन, वारा वा पाऊस असतानाही टेकडीवर धावण्यासाठी जातो. कारण, आरोग्य हेच जीवन आहे. व्यायामासाठी चांगली जीम लागते, असेही नाही. आपण साध्या व्यायामशाळेतही व्यायाम करू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने जिद्दीने व्यायाम करावा. त्याचा उपयोग आपल्यासह कुटुंबीयांनाही झाल्याशिवाय राहणार नाही. 
शब्दांकन - अरुण सुर्वे

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com