esakal | जागतिक आयोडीन कमतरता दिन : जिभेचे चोचले पुरविणे थांबवा अन्यथा उद्भवतील गंभीर समस्या
sakal

बोलून बातमी शोधा

avoid fast food for better iodine

जगभरात आयोडीन न्यूनता विकाराचे दोनशे कोटींहून अधिक रुग्ण आहेत. त्यामुळेच 21 ऑक्‍टोबर हा 'जागतिक आयोडीन न्यूनता दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतातही आयोडीन न्यूनतेची तीव्रता लक्षात घेऊन केंद्र शासनाने 1962 पासून राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली होती.

जागतिक आयोडीन कमतरता दिन : जिभेचे चोचले पुरविणे थांबवा अन्यथा उद्भवतील गंभीर समस्या

sakal_logo
By
प्रभाकर कोळसे

नंदोरी(जि.वर्धा): आजच्या फास्टफूडच्या काळात आयोडीनची पर्वा कुणाला आहे. जिभेचे चोचले पुरविले म्हणजे झाले. लहान मुलांचे पिझ्झा-बर्गर देऊन हवे तसे लाड करणाऱ्या पालकांनो सावधान. तुमच्या मुलाच्या आरोग्याच्या तक्रारी यातूनच पुढे निर्माण होणार आहेत. शरीरात पुरेसे आयोडीन जाते की नाही हे पाहणे अत्यावश्‍यक आहे. अन्यथा गलगंड, शरीराची वाढ खुंटणे आणि थॉयरॉइडच्या समस्या उद्‌भवण्याचा धोका आहे.

जगभरात आयोडीन न्यूनता विकाराचे दोनशे कोटींहून अधिक रुग्ण आहेत. त्यामुळेच 21 ऑक्‍टोबर हा 'जागतिक आयोडीन न्यूनता दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतातही आयोडीन न्यूनतेची तीव्रता लक्षात घेऊन केंद्र शासनाने 1962 पासून राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली होती. 1992 मध्ये राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रमाचे नाव बदलून 'राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम' असे करण्यात आले.

हेही वाचा - हो साहेबऽऽ चोरी केली आम्ही; मात्र, एकाही पैशाला हात लावला नाही; वाचा काय सांगतात चोरटे

भारतात जवळपास साडेसात कोटी लोकांमध्ये आयोडीनची कमतरता आढळून आली आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या एका अहवालानुसार उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजे एक कोटी तीस लाख लोकांमध्ये आयोडीनची कमतरता आढळून आली आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश व बिहारमध्ये सुमारे 82 लाख लोकांमध्ये कमतरता आहे. राज्यात जवळपास 62 लाख लोकांमध्ये आयोडीनची कमतरता असून गुजरातमध्ये हेच प्रमाण 42 लाख एवढे आहे. खरेतर ही गोष्ट साधीशी आहे. शरीराला पुरेसे आयोडीनयुक्त मीठ मिळाले की हा प्रश्न सहज सुटणारा आहे. साधारणपणे 150 मायक्रोग्रॅम आयोडीनची शरीराला दररोज गरज असते. राज्यात हा आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम जोरात राबविला जातो. यासाठी गलगंड रुग्णांची शोधमोहीम राबविली जाते. आदिवासी भागात स्त्रियांचे आरोग्य चांगले राहावे व अर्भक मृत्यू रोखण्यासाठी आयोडीनयुक्त मिठाच्या पाकिटांचे वाटपही केले जाते. मिठाच्या नमुन्यांची तपासणी तसेच ज्या भागात याचा प्रादुर्भाव आहे तेथील लोकांच्या लघवीचे नमुनेही आरोग्य विभागाकडून तपासण्यात येतात. 

हेही वाचा - शेतकऱ्याने लढवली शक्कल; शेतपिकांच्या सुरक्षेसाठी...

सुदृढ आरोग्यासाठी आयोडीनची मात्र आवश्‍यक -
भविष्यातील आरोग्याचा विचार करून शरीराला पुरेसे आयोडीन कसे मिळाले, याची काळजी खाण्या-पिण्यातून घेण्याची गरज आहे. गर्भधारणेनंतर मातेच्या शरीरात पुरेसे आयोडीन नसेल तर जन्माला येणाऱ्या बाळाच्या मेंदूच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञ डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. एकूणच गलगंड, थायरॉईड, वाढ खुंटणे, गर्भारपणात माता व बाळाचे आरोग्य जपायचे असेल तर पुरेशा सकस आहाराबरोबरच आयोडीनची समतोलही राखणे आवश्‍यक आहे.