वजन कमी करण्यासाठी 'या' तांदळाचे करा सेवन...  ठरेल फायदेशीर

प्राजक्ता निपसे
Tuesday, 14 July 2020

वजन घटवण्यासाठी लोक सर्वात आधी आपल्या जेवणातून भात वर्ज्य करतात. वजन वाढलेल्या व्यक्तीला भात न खाण्याचाच सल्ला सुद्धा दिला जातो. पण खरंच भात खाल्ल्यानं वजन वाढते का ?

पुणे : तुम्ही देखील वजन कमी करण्यासाठी भात खाणे बंद केले आहे का ? पण असे करण्याची काही आवश्यकता नाही. तांदळामध्येही वेगवेगळे प्रकार आहेत. ब्राउन राइस, लाल तांदूळ आणि प्रक्रिया न केलेला तांदूळ यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. आपल्या आहारामध्ये या तांदळाच्या प्रकारांचा समावेश करू शकता.

वजन घटवण्यासाठी लोक सर्वात आधी आपल्या जेवणातून भात वर्ज्य करतात. वजन वाढलेल्या व्यक्तीला भात न खाण्याचाच सल्ला सुद्धा दिला जातो. पण खरंच भात खाल्ल्यानं वजन वाढते का ? तांदळामध्ये कार्बोहायड्रेट आणि फायबर हे घटक असतात. हे घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण तांदळातील ग्लायसेमिक इंडेक्स अधिक असते. मग यामुळे रक्तातील शर्करा वाढते.

अन्य पदार्थांच्या तुलनेत तांदळाचे पचन लवकर होते. यामुळे सतत भूक लागते. सतत काहींना काही खात राहिल्याने शरीरातील कॅलरीचे प्रमाण वाढते. भात खाण्याचे फायदे आहेत तसंच तोटे देखील आहेत. काही प्रकारचा भात खाल्ल्यानंतर वजन पटकन कमी होण्यास मदत मिळते. तसेच जर तुम्ही योग्य पद्धतीनं भात शिजवला तर वजन वाढण्याची समस्या निर्माण होणार नाही.

विविध तांदळामधील कॅलरीचे प्रमाण... 
सर्व प्रकारच्या तांदळामध्ये कॅलरीचे प्रमाण असते. ब्राउन राइस, रेड राइस, पाउंड राइस आणि पॉलिश न केलेल्या तांदळामध्येही अधिक प्रमाणात फायबर असते. हे तांदूळ शिजवून खाल्ल्यास वारंवार भूक लागत नाही. वजन घटवण्यासाठी खनिजे, फायबर आणि व्हिटॅमिन युक्त अन्नपदार्थांचा आहारामध्ये समावेश करणं आवश्यक आहे. हे सर्व पोषक घटक प्रक्रिया केलेल्या तांदळामध्ये नसतात. ब्राउन आणि रेड राइसमध्ये अँटी ऑक्सिडेंट आणि फायबर अधिक प्रमाणात असतात. यामुळे वजन घटण्यास मदत मिळते.

१ ​लाल तांदूळ... 
लाल तांदळामध्ये फायबर, व्हिटॅमिन बी१, व्हिटॅमिन बी२, लोह आणि कॅल्शिअम या घटकांचे प्रमाण भरपूर असते. लाल तांदूळ आरोग्यासाठी लाभदायक आहे. या तांदळामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असतात. यामधील पोषक घटकांमुळे रक्तदाब, हृदय विकाराचा धोका कमी होतो. यामध्ये असणाऱ्या मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअममुळे दात मजबूत होतात. तसंच चयापचयाची क्षमता देखील वाढते

२ ​​​ब्राउन राइस... 
ब्राउन राइसमध्ये डाएटरी फायबर अधिक प्रमाणात असते. या तांदळामुळे चयापचयाची क्षमता वाढते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. ब्राउन राइसमध्ये कमी प्रमाणात कॅलरी असते. या तांदळामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी होण्यास मदत मिळते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोणत्याही प्रकरचा अडथळा निर्माण होत नाही. हृदयविकारांचा धोका कमी होतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ब्राउन राइस लाभदायक आहे. यातील पोषण तत्त्वामुळे रक्तातील शर्करा वाढत नाही.

​३ काळा तांदूळ...
काळ्या तांदळामध्ये अँटी ऑक्सिडेंटचे प्रमाण सर्वाधिक असते. या तांदळावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी6, झिंक, फॉस्फोरस, नियासिन आणि फॉलेट हे गुणधर्म असतात. काळ्या तांदळातील पोषक तत्त्व शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास मदत करतात. काळ्या तांदळाच्या सेवनामुळे शरीर डिटॉक्स होतं. म्हणूनच आपले कित्येक गंभीर आजारांपासून संरक्षण होते.

हेही वाचा :'ही' लक्षणं असतील तर घोरण्याचा आजार असू शकतो..

४ सफेद  तांदूळ... 
सफेद तांदूळ आरोग्यासाठी चांगला नसतो. केमिकल प्रोसेसिंग दरम्यान यातील बहुतांश खनिजे आणि पोषक तत्त्व बाहेर फेकली जातात. १०० ग्रॅम पांढऱ्या तांदळामध्ये १५० कॅलरी असतात. आणि यातील ग्लायसेमिक इंडेक्स देखील अधिक असते. पांढरा तांदूळ अधिक खाल्ल्यानं टाइप २ मधुमेह होण्याचा धोका देखील असतो, अशी माहिती एका संशोधनाद्वारे समोर आली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार भातामध्ये आर्सेनिक हे रसायन अधिक प्रमाणात आढळते. यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

​​वजन घटवण्यासाठी तांदळाचे कश्याप्रकारे सेवन करावे... ?
तळलेला भात कधीही खाऊ नये. तळलेला भात आरोग्यासाठी हानिकारक असतो. तांदूळ पाण्यामध्ये काही वेळ भिजत ठेवा. तीन ते चार वेळा तांदूळ धुतल्यानंतर शिजवून घ्या. असे केल्यास यातील स्टार्चचे प्रमाण कमी होते. तांदळासोबत फायबरयुक्त भाज्यांचे सेवन करा. ब्राउन राइस नारळाच्या तेलामध्ये शिजवून खावा. यामुळे शरीरामध्ये कमी प्रमाणात कॅलरी जातील आणि वजन नियंत्रणात राहील.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the best kind of rice for weight loss

Tags
टॉपिकस