कळा ज्या लागल्या जीवा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Bhagyashree zope writes What can you do to treat different pains quickly at home

आज आपण वेगवेगळ्या दुखण्यांवर पटकन घरच्या घरी किंवा सोपेपणाने काय उपचार करता येतात ते पाहू या.

कळा ज्या लागल्या जीवा!

- डॉ. भाग्यश्री झोपे

दुखणे, वेदना कुणालाच नको असतात. शरीर सुद्धा त्याला शक्य असेपर्यंत असंतुलन सहन करते, पण तरीही जर चूक सुधारली गेली नाही, तर मग मात्र दुखण्याच्यारूपाने शरीर आपली व्यथा व्यक्त करते. अशा वेळी दुखणे कमी करणे आणि मूळ कारण दूर करणे अशा दोन्ही स्तरांवर काम करावे लागते. ‘वेदना नास्ति विना वातात्’ असे सांगितलेले आहे, म्हणजे वेदना वाताशिवाय नसतात. पावसाळा हा वातप्रकोपाचा ऋतू. त्यामुळे या ऋतूत कधी पोटदुखी, कधी कंबरदुखी, कुणाला सांधेदुखी, कुणाला डोकेदुखी आणि असा काही ना काही त्रास होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. आज आपण वेगवेगळ्या दुखण्यांवर पटकन घरच्या घरी किंवा सोपेपणाने काय उपचार करता येतात ते पाहू या.

हवेत आर्द्रता वाढली की अग्नी मंदावतो, अशा स्थितीत जड किंवा प्रकृतीला प्रतिकूल असे काही खाण्यात आले तर पोट दुखते, फुगते, गुरगुर होते, शौचाला व्यवस्थित होत नाही. अशा वेळी लिंबाचा रस दोन चमचे, आल्याचा रस अर्धा चमचा, चवीपुरते काळे मीठ, चिमूटभर सैंधव,ओवा व जिरे यांची पूड असे सर्व एकत्र करून थोडे थोडे घेण्याचा उपयोग होतो. बरोबरीने पोटावर संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल लावून वरून गरम पाण्याच्या पिशवीने शेक केला तर अजून चांगला गुण येतो. शौचाला होत नसेल, खडा होत असेल आणि बरोबरीने पोट दुखत असेल तर एरंडेल तेल थोडेसे गरम करून नाभीत सोडण्याचा, पोटावर आजूबाजूला एरंडेल लावून रुईच्या पानांनी शेक करण्याचा उपयोग होतो.

बरोबरीने रात्री झोपण्यापूर्वी कपभर कोमट पाण्यात दोन चमचे घरी बनविलेले साजूक तूप व चिमूटभर सैंधव मिसळून घेण्याचा फायदा होतो. पटकन सर्दी होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांचे पावसाळ्यात डोके जड होऊन दुखू शकते. अशा वेळी सहाणेवर थोडे पाणी घेऊन त्यावर सुंठ उगाळून लेप तयार करावा व कपाळावर हा लेप १०-१५ मिनिटांसाठी लावून ठेवावा. संवेदनशील त्वचा असणाऱ्यांना यात थोडे चंदन उगाळून मिसळावे लागते.

पित्ताची प्रकृती किंवा उष्णतेचा त्रास होणाऱ्या व्यक्तींना पावसाळ्यात पाऊस न पडता ऊन पडले तर लगेच डोके दुखण्याचा त्रास होतो. यावर टाळूवर, मानेवर आणि जेथे डोके दुखेल असे वाटते त्या सर्व ठिकाणीसंतुलन रोझ ब्यूटी सिद्ध तेल जिरवण्याचा उपयोग होतो. बरोबरीने संतुलन पित्तशांती गोळ्या, कामदुधा गोळ्या घेण्याचाही फायदा होतो. आमवात म्हणजे फिरती वेदना असणारा सांधेदुखीचा त्रास.

यात कधी हा, कधी तो अशा प्रकारे निरनिराळे सांधे सुजतात व दुखतात. यावर दुखणाऱ्या सांध्यावर निर्गुडीच्या पानांपासून बनविलेल्या काढ्याची गरम गरम धार धरण्याचा उपयोग होतो. समुद्रकिनाऱ्यावरील रेतीची पुरचुंडी बांधून ती गरम करून दुखणारा भाग शेकण्याचा उपयोग होतो. समुद्रकिनाऱ्यावरील रेती न मिळाल्यास वीट बारीक करून त्याच्या चूर्णाच्या पुरचुंडीने शेक केला तरी चालतो. बरोबरीने लसणाची फोडणी देऊन बनविलेले कुळथाचे पिठले, पिठात एक चमचा एरंडेल तेल मिसळून तयार केलेली तांदळाची किंवा ज्वारीची भाकरी, ओली हळद व आल्याचे लोणचे असा आहार ठेवण्याचा अधिक चांगला उपयोग होतो. वयोमानानुसार दुखणारे सांधे, गुडघेदुखी यावर संतुलन शांती सिद्ध तेल जिरवण्याचा व वरून निर्गुडी, एरंड, शेवगा यातील मिळतील त्या झाडाची पाने वाफवून त्याने शेक करण्याचा उत्तम उपयोग होतो. बरोबरीने वातबल गोळ्या, तूप-साखरेसह प्रशांत चूर्ण घेण्याचाही उपयोग होताना दिसतो.

मूळव्याधीच्या त्रासात गुदभागी वेदना या शत्रूप्रमाणे त्रासदायी असतात. कधी कधी मलत्यागानंतर ६-६ तासांसाठीसुद्धा दुखत राहते. अशा वेळी जेवणाच्या मध्यात वाटीभर ताज्या ताकात एक चमचा गूळ आणि पाव चमचा हिरड्याचे चूर्ण घेण्याचा उपयोग होतो. गुदभागी ताजा कोरफडीचा गर लावण्याचा किंवा व्रणरोपण तेल लावण्याचा फायदा होतो. पावसाळ्यात कैक वेळा टाचदुखीचाही त्रास होतो. यावर टाचेवर थोडेसे शांती तेल लावून वरून वाळूच्या पुरचुंडीने किंवा विटकरीच्या चूर्णाच्या पुरचुंडीने शेक करण्याने बरे वाटते. जुने कुरूप एरवी फारसे दुखले नाही तरी पावसाळ्यात मात्र एकाएकी ठणकायला लागते. यावर गव्हाच्या पिठाच्या पोटीसाने शेक करण्याचा उपयोग होतो. यासाठी थोडे गव्हाचे पीठ, तेल, मीठ, हळद आणि आवश्यक तेवढे पाणी मिसळून कणीक मळावी, त्याला लंबगोलाकार देऊन एक टोक तापलेल्या तव्यावर गरम करून ते टोक कुरुपावर टेकवून क्षणभरासाठी चटका बसेल एवढ्या प्रमाणात शेक करावा. दररोज एकदा अशा प्रकारे शेक केल्यास बघता बघता कुरुपाचा त्रास पूर्णपणे बरा होतो असा अनुभव आहे. कंबरदुखी, मानदुखी, सायटिका या प्रकारच्या त्रासांवर संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल लावण्याचा, वरून गरम पाण्याच्या पिशवीने किंवा शक्य असल्यास निर्गुडी, एरंड, सागरगोटा, शेवगा यातील मिळतील त्या वनस्पतींच्या पानांचा शेक करण्याचा उपयोग होतो. सायटिका हे दुखणे खूप त्रासदायक असते. यावर एरंडमुळाचा क्षीरपाक घेण्याचा उपयोग होतो. १० ग्रॅम एरंडमुळामध्ये एक कप पाणी, एक कप दूध मिसळून मंद आचेवर एक कप दूध शिल्लक राहीपर्यंत उकळावे व गाळून घेऊन प्यावे. पावसाळ्यात बऱ्याचदा अंग दुखते, विशेषतः ज्येष्ठ व्यक्तींना अंगदुखीचा त्रास होतो. यावर रात्री झोपण्यापूर्वी अंगाला संतुलन अभ्यंग तेल लावून दुसऱ्या दिवशी सॅन मसाज पावडर या उटण्याने स्नान करण्याचा उत्तम उपयोग होताना दिसतो. तेव्हा अशा प्रकारे दुखणे जाणवले की वेदनाशामक औषध घेणे हाच एकमेव पर्याय नसतो. कारणाकडे थोडे लक्ष दिले तर अशा प्रकारच्या घरगुती उपचारांचा उत्तम उपयोग करून घेता येतो.

Web Title: Dr Bhagyashree Zope Writes What Can You Do To Treat Different Pains Quickly At Home

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..