घडण-मंत्र : भावंड : का, केव्हा?

पहिले मूल दोन तीन वर्षांचे झाले, की आई-बाबांना सगळीकडून सूचना मिळायला सुरवात होते, ‘आता लवकर विचार करा. उगाच उशीर नको.’
घडण-मंत्र : भावंड : का, केव्हा?
Summary

पहिले मूल दोन तीन वर्षांचे झाले, की आई-बाबांना सगळीकडून सूचना मिळायला सुरवात होते, ‘आता लवकर विचार करा. उगाच उशीर नको.’

- डॉ. भूषण शुक्ल

पहिले मूल दोन तीन वर्षांचे झाले, की आई-बाबांना सगळीकडून सूचना मिळायला सुरवात होते, ‘आता लवकर विचार करा. उगाच उशीर नको.’

एकाला दोन बरे असा आपला पिढ्यान्पिढ्या चालत आलेला प्रघात आहेच, त्यामुळे अनेक पालक दुसरे मूल होऊ द्यावे का या विचारात असतात. अनेकदा लहान मूल स्वतः सुद्धा भावंडाची मागणी करते. खेळण्यासाठी घरचे हक्काचे भाऊ-बहीण असावी, असे मुलांना वाटणे साहजिकच आहे.

एकटी मुले जास्त त्रासदायक होतात किंवा बिथरतात, असा अनेक पालकांचा समज असतो. एकट्या मुलांना जास्त लक्ष मिळते, साधने जास्त मिळतात यात काही शंकाच नाही. अगदी दोन खोल्यांच्या घरातही एकटे मूल रुबाबात राहते.

खरेतर मुलाचा मूळ स्वभाव आणि परिस्थितीने लावलेले वळण या दोन गोष्टींवर खूपसे अवलंबून असते. त्यामुळे, मूल एकटे असो की दुकटे, घरातले वातावरण हे जास्त महत्त्वाचे ठरते. पण, ‘मला खेळायला कोणीतरी हवे,’ या मुलाच्या हट्टापायी दुसरे मूल होऊ देणे हे म्हणजे डोकेदुखी थांबवण्यासाठी डोक्यात दगड मारून घेण्यासारखे आहे!

दुसरे मूल आणि काळजी

1) आपल्याला अजून एक मूल हवे असे आई-बाबा दोघांनाही मनापासून वाटत असल्यास दुसऱ्या मुलाचा विचार करणे योग्य. बाकी सर्व कारणे ही वरवरची आहेत.

2) एकाच मुलावर पूर्णविराम घ्यायचा ठरल्यास मात्र योग्य पालकत्व आणि संस्कार याची जबाबदारी वाढते. अती लाड, कौतुक आणि चैनीचा मारा होणार नाही, पाय जमिनीवर राहतील याची जास्त काळजी आई वडिलांना घ्यावी लागते.

3) दुसऱ्या बाळाच्या आगमनाची तयारी करताना पहिल्या मुलाची मानसिक तयारी करणे हा महत्त्वाचा भाग समजला जातो. दुर्दैवाने, दुसऱ्या बाळाचे आगमन हे प्रकरण फार जास्त चर्चिले गेले आणि सतत त्याबद्दल तयारी करण्याच्या सूचना मुलाला दिल्या गेल्या, तर त्याचा उलटा परिणाम होण्याची शक्यता जास्त असते.

4) दुसरे मूल येणार म्हणजे पहिल्यावर काहीतरी भयंकर अन्याय होणार आहे किंवा त्याच्यावर काही जबरदस्त परिणाम होणार आहे या थाटात बोलणे, वागणे किंवा सतत त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करणे यामुळे प्रश्न निर्माण होतो आणि वाढतो.

5) पहिल्यापासून मूल घरातल्या सर्वांशी व्यवस्थित जुळून असल्यास नव्या बाळाच्या येण्याचा त्याला त्रास न होता उलट मजाच वाटते. अगदी सुरवातीपासून भावंडांना एकत्र राहू देणे आणि मोठ्या भावंडाला मदतीला घेणे याचा खूप उपयोग होतो. ‘तू हात लावू नको, तू दूर राहा, तू बाळाला घेऊ नको,’ अशा सूचना सतत दिल्या तर ‘तुझ्यापासून लहान बाळाला धोका आहे,’ असे समजले जाते आणि मग मोठे मूल हट्टाला येते किंवा रागावते.

6) सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतके दिवस आपल्याला न जमलेल्या सवयी जर ‘आता तू दादा/ताई झाली ना, मग असे वागायचे का?’ म्हणून गळ्यात मारायचा प्रयत्न केल्यास मोठे मूल नाराज होते आणि लहान भावंड त्याला त्रासदायक वाटते. सतत मोठेपणा नकोसा होऊन मग अगदी लहान बाळाप्रमाणे वागायचा प्रयत्न करणे, हट्ट करणे, बोबडे बोलणे, अंथरुणात शू करणे असे बदल दिसायला लागतात. बाळावर राग राग करणे किंवा आई-बाबांवर रागावणे अशा टोकाच्या गोष्टीसुद्धा दिसतात.

हे वागणे साहजिक आहे. थोडे समजुतीने आणि प्रेमाने घेतल्यास सगळे नीट होईल, असा समजूतदारपणा कुटुंबाने दाखवला तर काम खूप सोपे होते. लाडांचा, जबाबदारीचा किंवा रागाचाही अतिरेक टाळला आणि मुलाचे लक्ष इतर गोष्टींमध्ये गुंतवले तर हा नाजूक कालखंड सोपा आणि सहज होतो. आई किंवा नवीन बाळाची तब्येत बिघडली किंवा जास्त काळजीचे काही झाल्यास मोठ्या मुलाला त्याची वयाला समजेल अशा भाषेत व्यवस्थित कल्पना द्यावी. काहीतरी बिघडले आहे याचा मुलांना लगेच अंदाज येतो आणि ते शांत किंवा अस्वस्थ होतात. महत्त्वाच्या गोष्टी लपवण्यापेक्षा नीट समजावून दिल्या आणि योग्य तो धीर दिला तर अगदी लहान मुलेसुद्धा आश्चर्य वाटेल इतका समजूतदारपणा दाखवतात.

पुढच्या लेखात आजी आजोबा या खजिन्याबद्दल बोलूया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com