घडण-मंत्र : संघर्ष टाळण्यासाठी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घडण-मंत्र : संघर्ष टाळण्यासाठी...

जोश आणि अधिरपणा याच्या जोरावर जगापेक्षा काहीतरी वेगळे करायची इच्छा असलेली पौगंडावस्थेतली मुले आणि भविष्याच्या काळजीने पोखरून गेलेले आई-वडील यांना एकाच छताखाली राहावे लागते.

घडण-मंत्र : संघर्ष टाळण्यासाठी...

- डॉ. भूषण शुक्ल

जोश आणि अधिरपणा याच्या जोरावर जगापेक्षा काहीतरी वेगळे करायची इच्छा असलेली पौगंडावस्थेतली मुले आणि भविष्याच्या काळजीने पोखरून गेलेले आई-वडील यांना एकाच छताखाली राहावे लागते. आणि अशा परिस्थितीत संघर्ष अटळ आहे.

समाजाच्या चाकोऱ्या मोडून काहीतरी वेगळे करणाऱ्या व्यक्ती या मुलांच्या स्फूर्तिस्थानी असतात. त्या वेगळेपणाने भारावून जाणे आणि स्वतः तसेच काहीतरी करण्याचा ध्यास धरणे आणि सतत त्याबद्दल बोलणे हे मुलांना भावते. ही सर्व मंडळी वेगळेपणाच्या नादात अगदी एकमेकांसाठी वागतात. आणि या विरोधाभासाची त्यांना तिळमात्र जाणीव नसते. मुलांनी शिक्षणावर लक्ष ठेवणे आणि पोटापाण्याच्या उद्योगाच्या रस्त्यावर लागणे हे पालकांचे ध्येय असते. त्यामुळे या सरळ रस्त्यापेक्षा काहीतरी वेगळे मुलाच्या डोक्यात शिरले, की पालक बिथरतात. हा संघर्ष टाळणे किंवा निदान त्यामुळे आपले मुलांबरोबरच नाते खराब होऊ नये याची काळजी घ्यावी लागते.

लक्षात ठेवण्याची आणि स्वतःला धीर देण्यासाठी उपयोगी पडणारी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे - कितीही चित्र-विचित्र कपडे, केशभूषा आणि भाषा वापरली तरी जवळजवळ सर्वच मुले चाकोरीतच राहतात. बहुतेक सर्व आव हा फक्त गप्पा मारण्यातच असतो. त्यामुळे उगाच वाद घालण्यात फारसे काही तथ्य नाही. काही मुले वेगळा रस्ता थोडा चालून बघतात. उदा. स्वतःच्या आवडीच्या विषयावर वेबसाइट बनवणे किंवा स्वतःचे यू-ट्यूब चॅनल बनवणे, स्वतःचा छोटा व्यवसाय करायचा

प्रयत्न करणे असे हे उपक्रम

असतात. मूल उत्साहाने ह्या गोष्टी करून बघत असताना पालक ‘ह्यामुळे अभ्यासाचा फोकस जातो,’ अशा काळजीत पडतात. काळजी वाटणे साहजिक आहे पण या काळजी पायी आपण कसे वागतो आणि काय बोलतो याचे भान ठेवावे लागते.

उपदेशाचे गिरमिट नको

मुलांना सतत उपदेश करत बसणे, गिरमिट मारणे, रागावून अद्वातद्वा बोलणे किंवा काहीतरी भयंकर चित्र उभे करायचा प्रयत्न करणे असे उद्योग केल्यास मुले स्वतःच्या कल्पनेचा ध्यास तर सोडत नाहीतच, पण दार बंद करून स्वतःला वेगळे करून घेतात. ही गोष्ट जास्त धोकादायक असते. निदान दहावीपर्यंत तरी मुलांना वेगवेगळे छंद जोपासणे आणि काही प्रयोग करून बघणे याची सवलत मिळायलाच हवी. मूल काय म्हणते आहे हे ऐकून घेणे, समजावून घेण्याचा प्रयत्न करणे, स्वतः थोडे वाचन करणे, प्रत्येक उपक्रमाचा संबंध ‘याचा पुढे पैसे मिळवायला काय उपयोग,’ असा न लावणे हे गरजेचे आहे. मुलांनी दहा गोष्टी करून पाहिल्या नाही, त्यांना खऱ्या जगाचा अंदाज कसा येणार? आई-वडिलांच्या सांगण्यावर १०० टक्के विश्वास टाकणारी मुले बदलत्या जगात बाजूला पडणार हे निश्चित.

इयत्ता दहावीच्या परीक्षेचा पालकांच्या मनात खूप मोठा बाऊ असतो. बहुतेक शाळा त्याला भरपूर खतपाणी घालतात आणि इयत्ता आठवीपासूनच अभ्यासाचे ढोल जोरजोरात वाजायला लागतात. गेल्या दोन दशकात दहावीचे निकाल हे ९५ ते ९८ टक्क्यांपेक्षा जास्त लागताहेत. आणि ‘दहावीत नापास’ ही भीतीदायक गोष्ट नामशेष झाली आहे. मात्र, पालकांच्या पिढीने दहावीची धास्ती आणि खोटे ग्लॅमर अजूनही सोडलेले नाही. मुले मात्र दहावीला गरजेपेक्षा जास्त महत्त्व द्यायला

तयार नाहीत. मला मनापासून यात मुलांची बाजू बरोबर वाटते आहे. ज्या मुलांना दहावीपर्यंत स्वातंत्र्य अनुभवायला मिळत नाही आणि सर्व ऊर्मी दाबून धास्तीच्या वातावरणात वाढवले जाते, त्यातली अनेक मुले दहावीनंतर लगेच बंड करायच्या मूडमध्ये पोहोचतात. त्यात जास्त धोका आहे.