घडण-मंत्र : स्वातंत्र्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घडण-मंत्र : स्वातंत्र्य

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोठमोठे कार्यक्रम चालू आहेत. घरोघरी तिरंगा लावण्यात घरातल्या मुलांनी किती उत्साहाने भाग घेतला ते आपण पाहिलेच.

घडण-मंत्र : स्वातंत्र्य

- डॉ. भूषण शुक्ल

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोठमोठे कार्यक्रम चालू आहेत. घरोघरी तिरंगा लावण्यात घरातल्या मुलांनी किती उत्साहाने भाग घेतला ते आपण पाहिलेच. संपूर्ण स्वातंत्र्य ही सर्व तरुणांची महत्त्वाकांक्षा असतेच. फक्त पूर्ण स्वातंत्र्य म्हणजे काय आणि ते कोणी कोणाला द्यायचे आणि कधी? हा घराघरात लढवला जाणारा विषय आहे.

वयात येणाऱ्या मुलांना असे मनापासून वाटते, की पालकांनी त्यांच्या बहुतेक गोष्टींची मुळीच दखल घेऊ नये आणि त्यांना स्वतंत्रपणे जगू द्यावे. उदा. - दिनक्रम, कपडे, मित्र मंडळी, साफसफाई इत्यादी. मुलांवर आपला किती ‘कंट्रोल’ पाहिजे याचा प्रत्येक घराचा आणि व्यक्तीचा वेगळा प्रकार असतो. मुलगे आणि मुली यांच्यात केला जाणारा भेदभाव इथे अगदी ठळक आणि उघड दिसू लागतो आणि अनेक वादांना तोंड फुटते. बरेचदा मोठ्या मुलासाठी नियम शिथिल केले जातात आणि समतेच्या नावाखाली धाकटापण ते नियम सोडून देतो आणि स्वतःच्या स्वातंत्र्याची कक्षा वाढवून घेतो आणि ‘मी तेवढा होतो तर तुम्ही मला हे करू देत नव्हता; पण याला सगळं करू देता,’ म्हणून उलटा मारसुद्धा पालकांनाच खावा लागतो.

मुले लहानपणी, म्हणजे अगदी एक-दोन वर्षांची असतानाच हा संघर्ष सुरू होतो. खाण्या-खेळण्यावरून तो प्रत्येक विषयावर पोहोचतो. खरं तर मुले मोठी होतात तसे एक एक करून विषय हे पालकांच्या फाईलमधून मुलांच्या फाईलमध्ये जाणे अपेक्षित आहे आणि मुलांना पूर्णपणे निर्णय स्वातंत्र्य मिळणे हा पालकत्वाचा परिपाक असला पाहिजे. ‘आता मुलांची काळजी राहिली नाही. त्यांनी काही स्वतःहून विचारले तरच आम्ही सांगतो,’ असा आत्मविश्वास पालकांना येणे म्हणजेच पालकत्व पूर्ण झाले असे म्हणता येईल.

तुमच्या मते काय वयापर्यंत हे सत्ता परिवर्तन होणे योग्य आहे? भारतीय संस्कृती म्हणते, की पालकांनी पन्नासाव्या वर्षी वानप्रस्थात जावे आणि मुलांना आपापले आयुष्य जगू द्यावे. हे तुम्हाला कसे वाटते?

माझ्या मते - ही महत्त्वाची चर्चा घरातल्या थोरांनी आपापसात करणे आणि सविस्तर निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या मुलाचे वय, त्यांची बुद्धी, व्यवहारज्ञान आणि आतापर्यंतचा प्रवास बघून हे स्वातंत्र्य टप्प्याटप्प्याने वाढवणे गरजेचे आहे. यावर एकमत असणे गरजेचे आहे. घरातल्या मोठ्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असतील तर मुले त्याचा फायदा उठवणार हे निश्चित आहे.

अनेकदा मुले घराबाहेर राहताना स्वतःच्या जबाबदार वागण्याचा प्रत्यय देतात. असे जबाबदार वागणे हा घरी जास्त स्वातंत्र्य देण्याचा स्पष्ट संकेत असतो. एखाद्या विषयात स्वातंत्र्य दिल्यावर त्यात सारखी लुडबुड करून, अती चौकशा करून, सारख्या सूचना (सा. सू. आठवते आहे ना?) देऊन उच्छाद मांडू नये.

ज्याप्रमाणे सायकल शिकतांना, तोल कसा सांभाळायचा हे शब्दात शिकवता येत नाही. प्रत्येकाला ते स्वतःहूनच शिकावे लागते आणि प्रत्येकाला त्यासाठी वेगळा वेळ लागतो त्याचप्रमाणे स्वातंत्र्य तोलायला आणि तोलतांना पडायला आणि पुन्हा उठून पुन्हा तोलायला वेळच द्यावा लागतो.

हे जाणूनबुजून आणि नियमितपणे केले तर मुलांचा उत्साह तर वाढतोच; पण आत्मविश्वाससुद्धा वाढतो. निर्णयक्षमता सुधारते. आपल्या हातातून मुलांच्या हातात निर्णयसत्ता जाताना थोडी खडखड तर होणारच. कमी-जास्त चुका होणारच. याची तयारी ठेवून हे केले तर पालकत्वाचा भार लवकर आणि सकारात्मक पद्धतीने हलका होतो.

Web Title: Dr Bhushan Shukl Writes Freedom

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :health