अपत्यासाठी पतीपत्नींची गर्भपूर्व तयारी

डॉ.पांडुरंग हरी कुलकर्णी
Monday, 20 April 2020

आपल्याला बाळ असावं असं प्रत्येक जोडप्याला वाटत असतं. ही अतिप्राचीन काळापासूनची नैसर्गिक भावना आहे. आयुर्वेदातील अष्टांग हृदय या ग्रंथात घरात रांगणाऱ्या लहान  बाळाचे काव्यमय वर्णन केले आहे.

आपल्याला बाळ असावं असं प्रत्येक जोडप्याला वाटत असतं. ही अतिप्राचीन काळापासूनची नैसर्गिक भावना आहे. आयुर्वेदातील अष्टांग हृदय या ग्रंथात घरात रांगणाऱ्या लहान  बाळाचे काव्यमय वर्णन केले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विवाह ठरवताना अनेक बाबी आपल्या इच्छेनुसार पाहिल्या जातात. पण मुलगा व मुलगी यांच्या पुनरुत्पादन संस्थेची (रिप्रॉडक्टिव्ह  सिस्टीम) सर्वांगीण तपासणी केली जात नाही. लग्ने जमविणाऱ्या संस्थांनी अशी व्यवस्था केली पाहिजे. यामुळे पुढे अपत्य होत नाही म्हणून संसारात न सुटणारा गुंता निर्माण होणार नाही.  हा पत्रिका पाहण्याला उत्तम पर्याय आहे. 

प्रेमविवाह करणाऱ्या मंडळींनी अपत्यहीन राहू असे ठरवले तरी , असा विचार असला तरी घरातले , दारातले लोक ' तुम्हाला मूल हवे ' हा विचार मनात ठसवताना आढळतात. आणि मग सल्ला,  तपासण्या, उपचार यांची आंधळी कोशिंबीर न संपण्यासाठी सुरू होते. प्रेमाचा रंग आकाशाच्या रंगा सारखा टिकाऊ राहण्यासाठी दोघापासून उत्पन्न झालेला अंकुर हवा असतो.

 

पुढे आपली मुलं वाढत असताना आपल्या लक्षात त्यांची काही व्यंगं येतात. उदाहरणार्थ वेडेवाकडे दात , तिरळेपणा , त्या दुरुस्त करण्यासाठी आई वडील काळजी पूर्वक प्रयत्न करताना दिसतात. ही दिसणारी व्यंगं असतात. पण पालकांच्या शरीरात असणारी कमतरता चर्मचक्षूंनी दिसू शकत नाही. त्यासाठी विशेषज्ञांकडे आधुनिक तंत्रज्ञान असते , उपकरणे असतात.त्याचा उपयोग करून मूल हवे आहे, असे ठरवल्यावर लगेचच स्त्रीने  गर्भाशय व आसपासच्या भागाची तपासणी करून घ्यावी. पुरुषांनीही आवश्यक टी तपासणी करणे हिताचे ठरते. खूप वर्षांपूर्वी एक जोडपे वंध्यत्वावर उपचारासाठी  स्त्रीरोगतज्ज्ञाकडे गेले असता तपासणीत मुलीला गर्भाशय नसल्याचे स्पष्ट झाले. दुसऱ्या एका केसमध्ये मुलाचे अंड ( टेस्टीज् ) दोन मांड्या मधील अंडाशयात उतरले‌ नव्हते. ते ओटीपोटातच राहिले होते.तिथल्या उष्णतेमुळे शुक्रजंतू  तयार होत नव्हते आणि जगतही नव्हते. म्हणून संबंधित शरीर रचना व क्रिया यांची चाचणी उपयोगी ठरते.

खरं म्हणजे मातेच्या उदरात गर्भ वाढत असताना आईची आणि पर्यायाने बाळाची काळजी घेणे गरजेचे आहे. खाण्याचे पदार्थ ताजे , गरम , थोडे , ठरलेल्या वेळी सावकाश खावे. शरीरातील जैविक घड्याळ त्या वेळेशी जोडले जाते. ही सवय आयुष्यभर अनुसरावी.आरोग्य उत्तम राहते.कारण त्यावेळी पाचकद्रव्ये , अंतःस्राव पाझरतात. पचन, शोषण , पोषण चांगल्या प्रतीचे होते.शरीर कार्यक्षम राहते. 

खाण्या पिण्यानंतर दिवसभर शरीराची हालचाल करत राहिले पाहिजे , हा उपदेश आचरणात आणणे. आपल्या आवडीचे व्यायाम / खेळ यांचा आनंद घ्यावा. दिवसातून दोन वेळा दहा मिनिटे डोळे मिटून शांत बसावे. स्वत:च्या आत पहावे.  आवडीचे छंद जोपासावे.

आत्तापर्यंत वर्णिलेल्या गोष्टी पाळाव्यात. करिअर नावाच्या मृगजळामागे धावताना लग्नाच्या वयाचा मैलाचा दगड केंव्हा मागे पडला हे लक्षातही येत नाही. मग वयाच्या तिशीनंतर काळ, काम व वेग यांचं गणित सुटण्यासाठी फक्त दमछाक झाली असे कळते. शरीरातील उष्णता वाढते, गर्भधारणा होण्यासाठी अनुकूल वातावरण कमी होत जाते. फ्लॅट , मोटार , अर्थ गुंतवणूक वगैरे इतरांचे डोळे दीपवते.  पण आपल्या जीवनातला अर्थ किती पाझरुन गेला याची मोजदाद नसते. साठ वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना  " बावीसावे वर्ष हे स्त्रीच्या बाबतीत पहिल्या बाळंतपणासाठी योग्य आहे.कारण शरीर लवचिक असते." असे वाचलेले आजही आठवते.आता काळ बदललेला आहे. तरीही पहिल्या बाळाबाबत तरी विवाहितांनी उशीर करू नये असे आग्रहाने सांगावेसे वाटते. 

डॉ.पांडुरंग हरी कुलकर्णी , आयुर्वेद वारिधी, मोबाईल फोन : ९८२२० ३७६६५ ).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr pandurang kulkarni writes about couple preparation for baby